चिपळूण : गोवळकोटचा पावटा विक्रीसाठी बाजारात

चिपळूण : गोवळकोट येथे सध्या थंडीतील दवावर पिकवण्यात आलेल्या सेंद्रिय पावट्याच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला आहे. मोंगा पार्टीसाठी पावट्याच्या शेंगांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून त्यामुळे दरही वाढले आहेत.

येथील गावात पावट्याच्या शेंगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बहुचर्चित मोंगा लावण्यासाठी या शेंगाचा वापर केला जातो. भातशेतीनंतर त्याच शेतजमिनीवर पावट्याचे बियाणे टाकण्यात येते; मात्र त्यासाठी पाणी न घालता या काळात येणाऱ्या थंडीतील दवाच्या पाण्यावर हे पीक घेतले जाते. त्यामुळे ते चविष्ट आणि उत्तम दर्जाचे असते. या पावट्याच्या शेंगांना वेगळा सुंगध असतो. गोवळकोट हे गाव वाशिष्ठी नदीकिनारी आहे. त्यामुळे येथील जागा पाणथळ आहे. नदीकिनारी असलेल्या शेतामध्ये पावट्याचे पीक घेतले जाते.

फेब्रुवारी अखेरपासून पावट्याच्या शेंगा बाजारात येऊ लागल्याने ग्राहक या शेंगा घेण्यास आतूर झाले आहेत. पावट्यासह वालाच्या शेंगा व चवळीच्या शेंगांसाठी येथील माती आणि हवामान खूप उपयुक्त आहे. त्यामुळे येथील शेतकरी पालेभाजीसह थंडीत पडणाऱ्या दवावर हे पीक घेतात. प थंडी व दव पडल्याने पावटा, वाल व चवळीच्या शेंगांच्या पिकांमध्ये भरघोस वाढ झालेली आहे; मात्र या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत घेऊन शेताची राखण करावी लागते. फेब्रुवारीपासून मोंगा पार्टीचे आयोजन केले जाते. त्यासाठी गोवळकोटमधील पावट्याच्या शेंगांना जास्त मागणी आहे. ३०० रुपये किलोप्रमाणे या शेंगा विकल्या जातात. पावटा, वाल व चवळीच्या शेंगांमुळे शेतकऱ्यांना ४० ते पन्नास हजार रुपयाचे उत्पन्न मिळते. चवळीच्या शेंगांचा एका किलोचा दर १२० रुपये, तर वालाच्या शेंगांचा एका किलोचा दर दीडशे रुपये असा आहे.

चार महिन्यांत येणाऱ्या या दवावर पिकलेल्या वालाचा उत्तम दर्जा असून, त्याला भौगोलिक मानांकन देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. भातशेतीनंतर त्याच शेतजमिनीवर पावटा बियाणे टाकण्यात येते; मात्र त्यासाठी पाणी न घालता या काळात येणाऱ्या थंडीतील दवाच्या पाण्यावर हे पीक घेतले जाते. त्यामुळे ते चविष्ट आणि उत्तम दर्जाचे असते. गोवळकोटमधील पावट्याला वेगळा सुगंध असतो. त्याची चवदेखील वेगळीच असते. त्यामुळे गोवळकोटच्या पावट्याला भौगोलिक मानांकन मिळायला हवे – जफर कटमाले, नागरिक, गोवळकोट

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 15/Mar/2025