चिपळूण : Shimgotsav 2025 : ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि भक्तांमध्ये उत्साह असा हा कोकणचा शिमगोत्सव असतो. चाकरमानी हमखास आपल्या गावी यानिमित्ताने येत असतो. त्या शिमगोत्सवाला आता सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस कोकण या उत्साहात न्हावून निघणार आहे. विशेष म्हणजे ग्रामदेवता थेट आपल्या घरातच भक्तांच्या भेटीला येत असल्याने आपण गावात यायलाच हवं या भूमिकेतून सर्वजण शंभो शहराला हमखास येत असतात.
चिपळूणचा शिमगोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. होळी पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत हा शिमगोत्सव सुरू असतो. चिपळूण शहरांमध्ये श्री जुना कालभैरव ग्रामदेवतेची पालखी तर २४ तास भक्तांची भेट घेत असते. दिवस-रात्र ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेव भक्तांच्या भेटीला येत असतो. त्यामुळे पाच दिवस चिपळूण शहर शिमगोत्सवात न्हाऊन निघते.
ग्रामीण भागात ग्रामदेवतेच्या पालख्या घराघरात भक्तांच्या भेटीला येत असतात त्यामुळे संपूर्ण तालुक्यासह ग्रामीण भागात भक्तीमय वातावरण निर्माण झालेले असते. अनेक दिवस बंद असणारी गावची घरे यावेळी उघडी असतात. गाव गर्दीने फुलून गेलेले असते. कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव या सणाला विशेष महत्त्व असते. यामुळे या कालावधीत गाव गजबजून जाते त्याचा प्रत्यय आज सर्वांना येत आहे.
चिपळूण तालुक्यात वैशिष्ट्यपूर्ण शिमगा आहे. तालुक्यातील सावर्डे येथे श्री केदारनाथ ग्रामदेवतेचा होल्टा होम विशेष प्रसिद्ध आहे. दरवर्षी होमाच्या आधी या ठिकाणी होल्टा होम खेळला जातो. मानकरी व रयत असे दोन्हीकडे पेटती लाकडे हातात घेऊन तरुण उभे असतात. ही जळकी लाकडे एकाने दुसऱ्याच्या अंगावर त्यानंतर दुसऱ्याने पहिल्याच्या अंगावर फेकली जातात. मात्र यात कोणीही जखमी होत नाही असे पाच वेळा केले जाते. सावर्डेमध्ये वर्षानुवर्ष अर्थात परंपरागत ही प्रथा कायम सुरू आहे. हा अनोखा होल्टा होम पाहण्यासाठी राज्यभरातून येथे मोठी गर्दी असते.
वैशिष्ट्यपूर्ण दुसरा म्हणजे, श्री करंजेश्वरी देवीचा होय. श्री करंजेश्वरी देवी आपल्या माहेरी पेठ मापमध्ये येते. यावेळी देवीला अनेक जण नवस बोलतात हे नवस बोलल्यानंतर त्या भक्तांचे नारळ वाशिष्टी नदी पात्रामध्ये पौर्णिमेच्या आदल्या रात्री नदीपात्रात मातीत लपवले जातात. आणि शेरणे उत्सवाच्या दिवशी देवीचे निशाण ज्यांचे नवस पूर्ण होतील त्यांचे नारळ शोधून बाहेर काढते. त्यामुळे मनोकामना पूर्ण होणार असा देवीचा कौल मिळतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी देखील राज्यभरातून भक्तगण येत असतात. देवीला नवस बोलण्यासाठी देखील अनेक लोक दरवर्षी वाशिष्टीच्या नदीवर उपस्थित राहतात.
गावागावातच ग्रामदेवतेचा हा उत्सव सुरू असतो. प्रत्येक गावात प्रथा परंपरा वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. ग्रामदेवतेची पालखी घराघरात जाते व त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणात पूजाअर्चा केली जाते. महाप्रसाद दाखवला जातो. या उत्सवात गावच्या विविध परंपरा पाहायला मिळतात. मानकरी, ढोलकरी, पोस्त वाले, निशान वाले, गावकर गावठ्या, गुरव अशा सर्व लोकांमध्ये उत्साह संचारलेला असतो. ग्रामदेवतेच्या नावानं चांगभलं ..! असा जयजयकार सर्वत्र सुरू असतो.
जसे गाव तशा प्रथा विविध ठिकाणी सुरू असतात. शिमगोत्सवाच्या निमित्ताने नमन खेळे असतात. ठीक ठिकाणी नमन खेळांचा कार्यक्रम देखील रंगतो. देवाला वर्षभराच्या राखणेसाठी गाऱ्हाणे घातले जाते. माड तोडल्यानंतर शिमगोत्सवाला प्रारंभ होतो आणि तो शिंपण्याच्या कार्यक्रमापर्यंत असतो.
अलीकडे पालखी नृत्य, ढोल वादन नृत्य अशा स्पर्धात्मक कार्यक्रमाने शिमगोत्सवाला कॉर्पोरेट रूप आले आहे. कोकणात येणाऱ्या एसटी महामंडळ, खाजगी किंवा विशेष रेल्वे गाड्यांना भरभरून गर्दी आहे. चाकरमानी देवाच्या भेटीला गावात येत आहे. गाव आता भक्तिमय वातावरणात रंगून गेले आहे. – समीर जाधव, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 15-03-2025














