रत्नागिरी : शीळ धरणात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शिळ धरणात गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत हा पाणीसाठा पुरणारा असला तरी उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने शिमगा संपल्यानंतर म्हणजेच रंगपंचमीनंतर प्रत्येक सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत रत्नागिरी नगरपरिषदेचा विचार सुरु झाला असल्याची माहिती आहे.

शिळ धरणाची पाणी साठवण क्षमता 3.666 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्यावर्षी सुद्धा कडक उन्हाळा होता. अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळासुद्धा लांबणीवर पडण्याची हवामान खात्याने भिती व्यक्त केली होती. या पार्श्वभुमीवर गेल्या मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात 1.65 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असताना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्या नंतर एप्रिल महिन्यापासून पावसाळा सुरु होईपर्यंत प्रत्येक सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर 4 जुलैपासून पाणीपुरवठा नियमित झाला होता.

शिळ धरणात शुक्रवारच्या पाहणीनुसार 2.051 दशलक्ष घनमीटर पाणी असल्याचे पाणी पातळीची मोजमाप करणारे पाटबंधारे विभागाचे अभियंता धामापुरकर यांनी सांगितले. रत्नागिरी शहरात सुमारे 11 हजार नळ जोडण्या असून धरणातील हा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणारा आहे. परंतु यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच कडाक्याचे ऊन पडू लागल्याने धरणातील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन त्याचप्रमाणात होऊन पाणीसाठा कमी होण्याची भीती आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणीविभागाने हा बाष्पीभवनाचा धोका ओळखून 24 मार्च पासून आठवड्यातील एक दिवस म्हणजेच सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 17-03-2025