चिपळूण : तालुक्यामधील अनधिकृत दगड खाणी आणि शासनाचे करोडो रुपये बुडीत महसूल याबाबतच्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी कोकण आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात केवळ स्मरणपत्रांचाच खेळ सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तक्रारीनुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कोकण आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र या प्रकरणी अहवाल न पाठवल्याने आता कोकण आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांनाच स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे. यापूर्वीही जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीसंदर्भात साळुंखे यांनाही चारवेळा स्मरणपत्र द्यावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विद्याधर साळुंखे हे गेल्या चार वर्षांपासून चिपळूण तालुक्यामधील बोरगांव, कौंढर आणि चिवेली येथील अनधिकृत दगड खाणींमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचे निदर्शनात आणून याविरोधात पाठपुरावा करत आहेत. मात्र, दोषी खाण मालकांना कर्मचारी पाठीशी घालत असल्याने या बाबतची तक्रार साळुंखे यांनी आयुक्त कार्यालयाकडे केली होती. या अनुषंगाने चौकशी करून, वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, याप्रकरणी कोणतीच कार्यवाही होत नसल्याने साळुंखे यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पुन्हा आयुक्त कार्यालयाकडे अर्ज सादर केला. या अर्जात त्यांनी तत्कालीन तहसीलदारांनी २९ अनधिकृत दगड-खाण मालकांना नोटीसा बजावल्याचे नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 18/Mar/2025














