मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत भव्य कलाविष्कार; मराठा भवन येथे रसिकांना विनामूल्य प्रवेश
रत्नागिरी:
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा भव्य कलात्मक आविष्कार रत्नागिरीकरांना अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतीची धगधगती ज्वाला !’ या विशेष संगीत, नृत्य आणि नाट्यमय कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता ‘मराठा भवन हॉल’ (जिल्हा परिषदेजवळ, माळनाका, रत्नागिरी) येथे पार पडणार आहे.
संगीत, नृत्य आणि नाट्यातून उलगडणार सावरकरांचा जीवनप्रवास
या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बालपणापासून ते स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे अतुलनीय योगदान, अंदमानातील सेल्युलर कारागृहातील अंगावर काटा आणणारा संघर्ष, रत्नागिरीतील त्यांचे ऐतिहासिक समाजसुधारणेचे कार्य, त्यांची समृद्ध साहित्यसंपदा आणि अखंड राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास संगीत, नृत्य, नाट्य आणि अभ्यासपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडला जाणार आहे. सावरकरांचे राष्ट्रभक्तीचे आणि क्रांतीकारी विचार आजच्या आधुनिक काळातही किती महत्त्वाचे आहेत, हे अधोरेखित करून नव्या पिढीपर्यंत राष्ट्रभक्तीची प्रेरणा पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मंत्री ॲड. आशिष शेलार यांची संकल्पना; प्रवेश विनामूल्य
हा भव्य सांस्कृतिक प्रकल्प राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकास मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांच्या विशेष संकल्पनेतून आकारास आला आहे. तसेच, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रमासाठी नागरिकांना प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. रत्नागिरीतील सर्व नागरिक, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी, स्थानिक कलाकार आणि चोखंदळ रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 14-07-2026













