जिल्हा परिषद ‘आदर्श शिक्षक’ आणि ‘आदर्श शाळा’ पुरस्कारांचे थाटात वितरण; वि. दा. सावरकर नाट्यगृहात सोहळा संपन्न
रत्नागिरी:
Ratnagiri Adarsh Shishak Puraskar (रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार) आणि आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत थाटामाटात पार पडले. रत्नागिरी येथील स्वांतत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित या भव्य सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक आणि शाळांना सन्मानित करण्यात आले. “पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावगावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी,” असे आवाहन याप्रसंगी बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंब्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरुकर यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षण संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव
जिल्हा परिषदेच्या वतीने २०२५-२६ या वर्षासाठीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जिल्ह्यातील खालील शिक्षकांना प्रदान करण्यात आला:
- मंडणगड: संजय करावडे
- दापोली: जावेद शेख
- खेड: एकनाथ पाटील
- चिपळूण: नरेश मोरे
- गुहागर: चंद्रकांत बेलेकर
- संगमेश्वर: विनय होडे
- रत्नागिरी: प्रदीप जाधव
- लांजा: नितीन शेंडगे
- राजापूर: सुहास कांगणे
या शाळांना मिळाला ‘आदर्श शाळा पुरस्कार’
सोहळ्यात २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन वर्षांतील आदर्श शाळांचा गौरव करण्यात आला. यामध्ये २०२४-२५ मधील जि. प. प्राथमिक शाळा बागाकोट किल्ला उर्दू (मंडणगड), जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पायरूळ (दापोली), जि. प. प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर व जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिरसोली क्रमांक १ (खेड), जि. प. प्राथमिक शाळा आंबवली व जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मोरते क्रमांक १ (चिपळूण), जि. प. प्राथमिक शाळा कुरिषडे शिगवणवाडी क्रमांक २ व जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द (गुहागर), जि. प. शाळा पाचेरीसडा क्रमांक ३ व वेलदूर घरटवाडी शाळा क्रमांक १ (संगमेश्वर), मामले घडशीवाडी व जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा हातीव क्रमांक ५ (रत्नागिरी), शिवार आंबेरे शाळा क्रमांक २ व भोके आंबेकरवाडी (लांजा), जि. प. प्राथमिक शाळा चाफेर्ट नेमण व जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुवे क्रमांक २ (राजापूर), जि. प. शाळा मोसम क्रमांक २ व कशेळी शाळा क्रमांक २ यांचा समावेश आहे.
तसेच २०२५-२६ या वर्षासाठी मंडणगडमधील शाळा मंडणगड, दापोलीतील जि. प. प्राथमिक शाळा गांधी चौक व पाल्घर मराठी शाळा, खेडमधील अजिलें शाळा क्रमांक १ व जि. प. शाळा शिर्वे, चिपळूणमधील आंबडस सोलकर व विंच्छर दस्तुरी शाळा, गुहागरमधील अंभोळ तांबडवाडी शाळा व वालोटी शाळा क्रमांक १, संगमेश्वरमधील पाचेरीसडा शाळा क्रमांक २ कव्हडीवाडी व वव्हेली शाळा क्रमांक १, रत्नागिरीतील तुरळ सुरवेवाडी व गोठणे पुनर्वसन हातीव शाळा, लांजातील नाखरे भगवती शाळा क्रमांक २ व भोके म्हाप्रळवाडी शाळा आणि राजापूरमधील जि. प. शाळा वेसुर्ले, इसवली सुतार व कोंड्येवळे गोताडवाडी तसेच कोंढ्ये कन्या शाळा यांना आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवा आणि स्मार्ट शाळा बनवा
पालकमंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जिल्ह्याला भारतरत्न पा. वा. काणे आणि साने गुरुजींसारख्या महान विभूतींचा वारसा लाभला आहे. साने गुरुजींच्या आईने दिलेला ‘श्यामची आई’ मधील संस्कार शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष रुजवायला हवा. सध्या ग्रामीण भागात घातक व्यसनांचे लोण पसरत असून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन लागू नये यासाठी पालकांसोबतच शिक्षकांनीही लक्ष दिले पाहिजे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे आकर्षण पाहता ‘सेमी इंग्रजी’ वर्ग अधिक व्यापकपणे राबवून स्मार्ट पीएमश्रीप्रमाणे स्मार्ट शाळा निर्माण कराव्यात. शाळा दुरुस्तीसाठी आधी मंजूर केलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीत आणखी ८ कोटींची वाढ करून तो २२ कोटी रुपये करावा, अशी मागणी शिक्षण सभापतींनी केली असता, त्याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 14-07-2026












