साडवली : शिवसेना (शिंदे गट) संगमेश्वर तालुका व दुर्गवीर प्रतिष्ठान रत्नागिरी कोकण विभाग यांच्या सहकार्याने संगमेश्वर तालुक्यात प्रथमच देवरूख येथे शिवकालीन ऐतिहासिक वस्तू संग्रह व दुर्गबीर प्रतिष्ठानचे गडकिल्ले फोटो प्रदर्शन भरवण्यात आले. याला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील ऐतिहासिक वस्तू संग्रह पाहून शिवकालीन इतिहासातच डोळ्यासमोर उभ्या राहिला असल्याची भावना हे प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी व्यक्त केल्या. यासाठी इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून हे प्रदर्शन रविवार दि. १६ व सोमवार दि. १७रोजी लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालय देवरुख येथे भरवण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार सुभाष बने, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार, श्री देवी सोळजाई मंदिराचे अध्यक्ष बापू गांधी, माजी सभापती संतोष लाड, सोळजाई मंदिर कमिटी सदस्य, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, दुर्गवीर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत डिंगणकर, रत्नागिरी जिल्हाप्रमुख रोहित बालडे, तालुकाप्रमुख तेजस रेवणे, तालुका समन्वयक निशांत जाखी आदी उपस्थित होते.
शिवकालीन ऐतिहासिक लढाईत वापरण्यात आलेली शस्त्रे या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने खांडा तलवार, कर्नाटकी घोप तलवार, पट्टीसा, नायर, कत्ती, खैबर, यातघन, दाब, कोरा, कुकरी असे तलवारीचे विविध प्रकार, कट्धार, ढाल, दगडाचे तोफ गोळे, काळविटच्या शिंगापासून बनविलेले दक्षिण भारतातील पारंपरिक मांडू हे शस्त्र, धनुष्यबाण, चिलखत, गुरगुज, भाला, फारशी, कुंत, शुल असे विविध शस्त्राचे प्रकार येथे मांडण्यात आले होते.
बदलापूर येथील प्रसिद्ध अभ्यासक सुनील कदम हे गेली २५ वर्षे गडकिल्ले सफर करणे, त्यांचे संवर्धन व शिवकालीन साहित्य संग्रह अशा पद्धतीने आपली आवड जोपासत त्यातून पुढील पिढीपर्यंत शिवकालीन इतिहास पोचविण्याचे काम करत आहेत. देवरुख येथील प्रदर्शनातील प्रत्येक शस्त्राची ओळख व ते केव्हा वापरले गेले याबाबत सविस्तर यावेळी त्यांनी दिली. या प्रदर्शनाला तालुक्यातून विविध शाळेच्या विद्यार्थ्यांसह, इतिहासप्रेमी व ग्रामस्थांनी भेटी दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 19/Mar/2025














