मुंबई : यंदाचा पावसाळा संपत असताना राज्यातील धरणांत गेल्यावर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा झाला आहे.
आतापर्यंत धरणांत १४९० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पीय क्षमतेच्या ८५ टक्के इतका हा पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हाच साठा केवळ ११५८ टीएमसी (६८ टक्के) होता. त्यामुळे यंदा पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. राज्यात साधारणतः १ जून ते १५ सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी समजला जातो. तिथून साधारणतः ऑक्टोबर मध्यापर्यंतचा कालावधी हा परतीच्या पावसाचा असतो. राज्यात मोठे, मध्यम आणि लहान मिळून एकूण २९९४ प्रकल्प (धरणे) आहेत. या सर्व धरणांची मिळून पाणी साठवण क्षमता १७०४ टीएमसी इतकी आहे. आजघडीला या सर्व धरणांत मिळून १४९० टीएमसी म्हणजे ८५ टक्के पाणीसाठा आहे. दोन-चार छोट्या धरणांचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश धरणे ७० ते ९० टक्क्यांपेक्षा जादा भरली आहेत. परतीच्या पावसामुळे धरणातील उरलीसुरली पाण्याची उणीवही भरून निघण्याची शक्यता आहे. सगळी धरणे ९० ते १०० टक्के भरण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मराठवाड्याची मिटली चिंता !
गेल्यावर्षी सर्वाधिक बिकट अवस्था मराठवाड्याची झाली होती. मराठवाड्यात त्यावेळी केवळ ४० टक्के पाणीसाठा होता. यंदा मराठवाड्याचा प्राणवायू असलेले पैठणचे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून अन्य सर्व धरणांमध्ये मिळून ७० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी अमरावती विभागालाही काही प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. यंदा या विभागातील सगळी धरणे परतीच्या पावसानंतर १०० टक्के भरतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भारनियमनातून सुटका !
गेल्यावर्षी कोयना धरण केवळ ८४ टीएमसी एवढेच भरले होते. त्यामुळे वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात झाल्यामुळे राज्याच्या काही भागाला ऐन उन्हाळ्यात भारनियमनाच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. यंदा तशी शक्यता दिसत नाही.
कमी होतील टैंकर !
गेल्यावर्षी राज्यातील बहुतांश धरणांत अत्यंत मर्यादित पाणीसाठा झाल्यामुळे शेतीसाठी पाणी मिळणे तर दूरच अनेक भागात पिण्याच्या पाण्याचीही वाणवा झाली होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या अंतिम पर्वात राज्यातील १० हजारांहून अधिक गावांची तहान टँकरने भागवावी लागत होती. यंदा टँकरवरील हे अवलंबित्व कमी होईल, अशी शक्यता आहे.
कोयना-उजनीही भरले !
सर्वात पाणीदार म्हणून गणल्या जात असलेल्या पुणे विभागाला गेल्यावर्षी पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागला होता. यंदा कोयना आणि उजनी धरणासह पुणे विभागातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक विभागाची अवस्थाही गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली झाली आहे. यंदा नाशिक विभागातील सर्व धरणांत मिळून ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागात ९३.९३ टक्के तर नागपूर विभागात ८५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पाणीसाठ्यात ३३२ टीएमसीची भर पडली आहे. परतीचा पाऊस सुरू झाला की या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 18-09-2024