दापोली : हर्णेमधील पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू

दापोली : हर्णे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्याने येथील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १९ मार्चपासून खोदलेला रस्ता पाईपलाईन जोडणीचे काम झाल्यावर क्रॉक्रिटीकरण करून पूर्ण करणार असल्याची माहिती हर्णेचे उपसरपंच महेश पवार यांनी दिली.

सध्या हर्णे पंचक्रोशीमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. त्यातच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यामधून जमिनीखालून पाण्याची वाहिनी गेली आहे. ही वाहिनी फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे पाईपलाईनचे काम करणे आवश्यक होते. म्हणूनच रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूने होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. १९ मार्चपासून एसटी महामंडळाची गाडी बायपासपर्यंतच येत आहे. काम पूर्ण होईपर्यंत एसटी महामंडळ बसची वाहतूक सुरू होणार नाही. याला पर्यायी मार्ग म्हणून थेट बारटक्के यांच्या बाजूने बंदरावर जाणाऱ्या रस्त्यावरून बंदरावर व पुढे लोखंडी मोहोल्ल्यातून मुख्य रस्त्यावर अशी छोट्या वाहनांची वाहतूक सध्या सुरू आहे. १२ वर्षे पेव्हरब्लॉकचा रस्ता असल्याने एकही खड्डा पडला नव्हता. आता पाईपलाईनच्या कामासाठी हा रस्ता खोदावा लागला, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या ठिकाणी ही पाईपलाईनला गळती लागली होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात आल्याने अरुंद रस्त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 21/Mar/2025