रत्नागिरी : थकबाकीदारांकडून ६५ लाख ८० हजारांची वसुली

रत्नागिरी : विजेच्या बिलाचा वेळीच भरणा न केल्याने रत्नागिरी परिमंडळ कार्यालयांतर्गत ३१ हजार १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीजजोडणी घेण्याची संधी अभय योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेत रत्नागिरी परिमंडळ कार्यालयातील ७८७ लघुदाब व उच्चदाब वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजारचा भरणा केला. यामध्ये जिल्ह्यातील ५४० ग्राहकांनी ५२ लाख ८६ हजार भरणा केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीज बिलांची थकबाकी असलेल्या जागेची मालकी बदलल्यानंतर नवीन जागा मालकास थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो; मात्र वीज बिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संघी ग्राहकांना उपलब्ध आहे. अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्वं अकृषक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

३० हजार ३४९ ग्राहकांना संधी
महावितरणने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडि खंडित केलेल्या ३० हजार ३४९ ग्राहकांना या योजनेत सहभाग नोंदवण्याची संधी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजार ५२९ वीज ग्राहक, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ हजार ८२० ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:32 PM 21/Mar/2025