उत्तरेकडील वाऱ्यामुळे मासेमारीला ‘ब्रेक’

दापोली : ऐन मासळी हंगामात उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे. यामुळे मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे.

उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे हर्णे बंदरातील मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना मासळी मिळालेली नाही. ऐन हंगामात मासळी मिळत नसल्याने बंदरावर भरणाऱ्या मासळी बाजारात शुकशुकाट आहे. रामनवमीनंतर पुढे ६ एप्रिल पर्यंत मासळी मिळेल, अशी आशा मच्छीमारांना असते. सध्या समुद्रामधील मासेमारीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्यामुळे एलईडी मासेमारीचे प्रमाण कमी झाल्याचे येथील मच्छीमार सांगतात; परंतु तरीही मासळी का मिळत नाही, याचे कोडे मच्छीमार बांधवांना पडले आहे.

जोरदार वाऱ्यामुळे शिमगोत्सवानंतर मासेमारीला गेलेल्या नौका तिथेच समुद्रात नांगर टाकून थांबल्या आहेत, तर ७० टक्के नौका आंजर्ले खाडीतच नांगर टाकून आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनचा हंगाम खूपच खराब गेला आहे.

गेल्या वर्षी काहीतरी निभाव लागला होता; परंतु यावर्षी अजूनही मासळी मिळालेली नाही. त्यामुळे बंदरामध्ये शुकशुकाट आहे. या स्थितीमुळे मच्छीमार आणि व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. बोटीवर काम करणाऱ्या खलाशांचे पगार कसे द्यायचे, बोटीचा खर्च कसा काढायचा, मुलांचे शिक्षण, घरचा खर्च कसा भागवायचा अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर उभ्या आहेत. होळीनिमित्त १३ ते १५ मार्चला सुट्टी होती. त्यामुळे तीन दिवस नौका बंदरात होत्या. शिमगोत्सवानंतर नव्या उत्साहाने मच्छीमारांनी समुद्रात जाण्याची तयारी सुरू केली होती.

मासळीही चांगली मिळेल, अशी आशा त्यांना वाटत होती. मात्र, त्याचवेळी उत्तरेकडून जोरदार वारे वाहू लागले. वाऱ्याचा जोर नेहमीपेक्षा अधिक असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे नौका मासेमारीला जरी गेल्या तरी वाऱ्यामध्ये जाळी गुरफटण्याचा धोका जास्त असतो. ही गुरफटलेली जाळी सोडवताना खूप नुकसान होते. एकेका जाळ्याची किंमत लाखो रुपये असते. त्यामुळे हे नुकसान सोसण्याची तयारी मच्छीमारांची नाही. त्यामुळे येथील मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 24/Mar/2025