Ratnagiri Coconut Arecanut Insurance : कोकणातील नारळ व सुपारी बागायतदारांना मोठा दिलासा; यंदापासून ‘प्रधानमंत्री पीकविमा योजना’ लागू!

हवामान बदलामुळे घटणाऱ्या उत्पादनातून मिळणार आर्थिक संरक्षण; जिल्ह्यातील ७४ महसूल मंडळांची निवड

Ratnagiri Coconut Arecanut Insurance : हवामान बदल आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या कोकणातील नारळ व सुपारी बागायती मोठ्या संकटात सापडल्या आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ‘प्रधानमंत्री पीकविमा योजने’अंतर्गत (PMFBY) यंदापासून नारळ व सुपारी पिकांचा नव्याने समावेश केला आहे. सततचे बदलते वातावरण, अवकाळी आणि कीडरोगांमुळे उत्पादनात घट आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो बागायतदारांना या निर्णयामुळे मोठा हक्काचा आधार मिळणार आहे.

आंबा-काजूपाठोपाठ नारळ-सुपारीही धोक्यात; काय आहेत प्रमुख कारणे?

जगभरामध्ये कोकणाला विशेष ओळख मिळवून देणाऱ्या हापूस आंब्यासह काजू पीक गेल्या दशकभरात सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आले आहे. कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागायतदार दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करत आहेत, तरीही उत्पादनातील घट थांबताना दिसत नाही. अशा स्थितीमध्ये हवामान बदलाचा कमी परिणाम होणारे आणि वर्षभरात दोनवेळा हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सुपारी बागायतीकडे वळले होते; मात्र, आता सुपारीच्या उत्पादनातही बदलत्या हवामानामुळे निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. नारळ पिकाचीही यापेक्षा वेगळी स्थिती राहिलेली नाही.

उत्पादन घटण्याची प्रमुख कारणे:

  • सातत्याने होणारी अतिवृष्टी आणि चक्रीवादळे.
  • बदलते हवामान आणि वाढते तापमान.
  • बुरशीजन्य आजार व कीडरोगांचा वाढता प्रादुर्भाव.
  • वाढलेली फळगळती आणि माकडांचा होणारा प्रचंड त्रास.

असे आहे पीकविमा संरक्षण आणि आर्थिक निकष

या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ पिकासाठी ५२, तर सुपारी पिकासाठी २३ अशी एकूण ७४ मंडळांची (काही सामायिक मंडळे मिळून) निवड करण्यात आली आहे. कमी तापमान, वेगवान वारा, जास्त तापमान, अतिवृष्टी, जास्त आर्द्रता, कमी पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान झाल्यास खालीलप्रमाणे विमा संरक्षण कवच मिळणार आहे:

पीक प्रकारनियमित विमा संरक्षण रक्कमगारपिटीकरिता स्वतंत्र अतिरिक्त संरक्षण
नारळ पीक₹ १ लाख ७० हजार₹ ५७ हजार
सुपारी पीक₹ १ लाख₹ ३३ हजार
  • नारळ पिकासाठीचे धोके: प्रामुख्याने वेगवान वारा म्हणजेच चक्रीवादळासदृश परिस्थिती आणि अतिशय कमी तापमान यामुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश आहे.
  • सुपारी पिकासाठीचे धोके: फळगळतीस कारणीभूत ठरणारा वेगवान वारा आणि अवकाळी पाऊस या घटकांपासून मुख्य संरक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ‘या’ महसूल मंडळांचा विमा संरक्षणात समावेश:

१) नारळ पीक (समाविष्ट ५२ मंडले):

  • रत्नागिरी : रत्नागिरी, खेडशी, पावस, जयगड, फणसोop, कोतवडे, मालगुंड, पाली, तरवळ, टेंभे, खालगाव.
  • लांजा : लांजा, पुनस, साटवली व विलवडे.
  • राजापूर : जैतापूर, भू, वाडापेठ, राजापूर.
  • गुहागर : गुहागर, हेदवी, तळवली, पाटपन्हाळे, आबलोली व पालशेत.
  • चिपळूण : रामपूर, शिरळ.
  • दापोली : दापोली, बुरोंडी, दाभोळ, आंजर्ले, वाकवली, वेळवी, पालगड, हर्णे, देगाव, आगरवायंगणी.
  • खेड : खेड, शिर्शी, आंबवली, कुळवंडी, भरणे, लवेल, धामणंद, तळे, भोस्ते, धामणदेवी, चिंचघर.
  • मंडणगड : मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे, वेसवी.

२) सुपारी पीक (समाविष्ट २३ मंडले):

  • रत्नागिरी : फणसोप, कोतवडे.
  • राजापूर : जैतापूर, भू, वाडापेठ.
  • गुहागर : गुहागर, हेदवी, तळवली, पाटपन्हाळे, आबलोली, पालशेत.
  • मंडणगड : देव्हारे, वेसवी.
  • दापोली : दापोली, बुरोंडी, दाभोळ, आंजर्ले, वाकवली, वेळवी, पालगड, हर्णै, देगांव, आगरवायंगणी.

“बागायतदारांना निश्चितच मोठा आधार मिळेल”

“सुपारीवर गेल्या काही वर्षांमध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात फळगळती होत आहे. व्यवस्थापनावर होणारा वाढता खर्च आणि मिळणारे कमी उत्पन्न यामुळे शेतकरी हवालदिल होता. हापूस आंबा व काजू पिकाप्रमाणेच सुपारी व नारळालाही पीकविम्याचे संरक्षण मिळावे, असा मागणीचा ठराव आपण राजापूर पंचायत समितीच्या बैठकीमध्ये मांडला होता. त्याची दखल घेऊन शासनाने हा सकारात्मक निर्णय घेतल्याने बागायतदारांना मोठा आधार मिळाला आहे.”

– राजेश गुरव (सदस्य, राजापूर पंचायत समिती)

“हवामान बदलाचा फटका आता सुपारी आणि नारळ बागांनाही बसू लागल्याने त्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. अशा कठीण स्थितीत शासनाकडून मिळालेले हे पीकविमा संरक्षण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे ठरेल.”

– संतोष पाटील (शेतकरी, राजापूर)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:35 11-07-2026