कोकणातील सागरी महामार्गाचे काम तीन वर्षांत पूर्ण होणार

मुंबई : कोकणच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा असलेला रेवस ते रेडी पर्यंतच्या सागरी महामार्गावरील रस्ते आणि पुलांसाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गावरील पुलांचे आणि रस्त्यांचे काम तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मंगळवारी दिली.

कोकणातील सागरी महामार्गाच्या प्रकल्पाची किंमत वाढत असून या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार, त्याबाबत शासनाचे कोणते धोरण आहे, असा प्रश्न भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) हा ५२३ किमी लांबीचा महामार्ग चार पदरी असून त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार असून या प्रकल्पाची किंमत २६ हजार ४६३ कोटी आहे. हा महामार्ग ३० वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. काही ठिकाणी तो साडेपाच मीटर आहे, तर काही ठिकाणी तो ७ मीटर आहे. आता तो चार मार्गिकांचा राहणार असून तो आता पूर्णतः नवीन होणार आहे.

महामार्गाच्या कामाचे दोन टप्प्यात नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात पुलांचे तर दुसऱ्या टप्प्यात रस्त्यांचे काम केले जाणार आहे. या मार्गात रेवस-कारंजा, रेवदंडा, बाणकोट, आगरदंडा, केळशी, दाभोळ, जयगड, काळबादेवी आणि कुणकेश्वर या ९ ठिकाणी पूल प्रस्तावित केले असून त्याची किंमत ९ हजार १०५ कोटी आहे. त्यापैकी पाच पुलांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. दाभोळ आणि काळबादेवी पुलासंदर्भात तांत्रिक गोष्टी असून ते लवकरच मार्गी लावण्यात येतील. शिवाय दुसऱ्या टप्प्यात केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी १७ हजार ३५७ कोटी एवढा खर्च येणार आहे. हा महामार्गासाठी लागणारी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या तीन वर्षात हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे भुसे यांनी सांगितले.

महामार्ग पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी अभ्यास :
कोकणच्या पर्यटनासाठी महत्वपूर्ण असलेला सागरी महामार्ग पर्यटन स्थळांना जोडण्याची मागणी होऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यातील २६, रत्नागिरी ३६ आणि सिंधुदुर्गमधील ३१ पर्यटनस्थळांना जोडरस्ते जोडण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात अभ्यास सुरु असून तो प्रगतीपथावर असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. तसेच एमएसआरडीसीच्या माध्यमातून ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 26/Mar/2025