रत्नागिरी : जिल्ह्यातील ठेकेदार आर्थिक संकटात

रत्नागिरी : जिल्ह्यातील ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात अडकले आहेत. वर्षभरात केलेल्या विविध विकासकामांचे सुमारे २०० कोटी रुपये येणे बाकी आहेत. मार्च महिना संपायला अवघे पाच दिवस शिल्लक असताना शासनाकडून कसलाही निधी आलेला नाही. त्यामुळे ठेकेदार चिंतातूर असून, शासनाकडून येणाऱ्या निधीकडे डोळे लावून बसले आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रत्नागिरी आणि चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध विकासकामे करण्यात आली. रस्ते, पूल, साकव आणि नाबार्डमधील कामे आहेत. ठेकेदारांनी ही कामे घेऊन आपल्या स्तरावर बहुतांशी कामे पूर्णही केली. लोकप्रतिनिधींशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे निधी मिळणार ही अपेक्षा ठेवून अनेकांनी या कामांमध्ये आपला पैसा गुंतवला आहे. रत्नागिरी विभागाचे सुमारे १०० कोटी रुपये देणे आहे आणि जिल्ह्यात सुमारे २०० कोटीच्या निधीची गरज आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर नवीन सरकारकडून ठेकेदारांना मोठी अपेक्षा होती; परंतु लाडकी बहीण योजना व अन्य योजनांचा शासनाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडला. यामुळे शासनाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचा मोठा परिणाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवर झाला आहे. मार्च महिन्यात तरी आपले पैसे मिळतील, अशी अपेक्षा ठेकेदारांना होती; परंतु मार्च संपायला पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ठेकेदार चिंतेत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 26/Mar/2025