रत्नागिरी : जिल्ह्यात १ हजार ६६१ माकडांना पकडून वनविभागाने सोडले नैसर्गिक अधिवासात

रत्नागिरी : माकडांचा उपद्रव हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता; परंतु वनविभागाच्या धडक मोहिमेमुळे याला चाप बसला आहे. ऑक्टोबर २०२४ ते ७ मार्च २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत वनविभागाने जिल्ह्यातील १ हजार ६६१ माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. माकडाला पकडण्यासाठी ८०० रुपये या प्रमाणे साडेतेरा लाख रुपये वनविभागाने खर्च केले आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून माकडं आणि वानरांच्या प्रचंड उपद्रवामुळे हातावर पोट असलेल्या शेतकरी अडचणीत आला आहे. वानरांच्या त्रासामुळे कोकणामध्ये कडधान्य, तृणधान्ये, पालेभाज्या, फळबागा, परसबागेत होणारा भाजीपाला करणे नागरिकांनी सोडून दिले आहे.

वानरांच्या त्रासामुळे कोकणातील शेकडो एकर जमिनी ओसाड पडल्या आहेत. त्यामुळे वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी मागील अनेक वर्षांपासून कोकणवासीय स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने मागणी करत होते. याची नोंद घेऊन काही दिवसांपूर्वी शासनाच्या वनविभागाकडून कोकणामध्ये वानर पकडण्यासाठी समाधान गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१६ ऑक्टोबर २०२४ ला कोतवडे येथून त्यांनी वानर पकडण्याच्या कामाला प्रारंभ केला. वानर पकडण्यासाठी पिंजरा ठेवून त्यामध्ये खाद्यपदार्थ ठेवून विशिष्ट आवाज काढून ते वानरांना बोलावतात.

वानर पिंजऱ्यात आल्यानंतर दोरीने पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून वानरं आणि माकडं पकडली जातात. जिल्हा नियोजनमधून या मोहिमेसाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ ते ७ मार्च २०२५ या कालावधीत वनविभागाने जिल्ह्यातील १ हजार ६६१ माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. रत्नागिरी तालुक्यात ५२५ वानरांना पकडण्यात आले. चिपळूण तालुक्यात ३२७ आणि उर्वरित दापोली अशी एकूण १६६१ माकडं आणि वानरांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

शेतकऱ्यांतून समाधान
जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढे ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजनमधून तरतूद करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 26/Mar/2025