हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य पूर्ण करूया : संभाजी भिडे

साडवली : हिंदवी स्वराज्य तसेच धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे तुकडे झाले तरीही ते नमले नाहीत, झुकले नाहीत. ते झुकले असते तर आज काय परिस्थिती असती? आज आपल्यापैकी अनेकांना छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा पूर्ण इतिहास माहितीही नसेल.

जो आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही तो पुढे काय इतिहास घडवणार..? त्यासाठी जागे व्हा.. या उभ्या देशात छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचे विचार पोहोचवूया. या थोर, पराक्रमी राजांचे हिंदवी स्वराज्याचे उरलेले कार्य सर्वांनी पूर्ण करायचे आहे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी साडवली येथील कार्यक्रमात केले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्ताने सोमवारी (ता. २४) सायंकाळी साडवली येथील बने स्कूलच्या मैदानावर भिडे गुरुजींचे व्याख्यान झाले. यापूर्वी भिडे गुरुजींनी कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भेट दिली.

त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत अभिवादन केले. भिडे गुरुजी म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे निर्माते हे छत्रपती शिवाजी महाराज होते. याच स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी २८९ लढाया लढल्या.

आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे देखील शेवटपर्यंत स्वराज्यासाठी जगले. पावणेनऊ वर्षांत जवळपास १३४ लढाया छत्रपती संभाजीराजांनी लढल्या. विशेष म्हणजे त्यात त्यांनी एकदाही माघार घेतली नाही. ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर कसबा येथे पकडण्यात आले त्यावेळचा प्रसंग भिडे गुरुजींनी आपल्या शैलीत मांडला. एकूण उपस्थित शंभूप्रेमींचे डोळे भरून आले. सूत्रसंचालन निबंध कानिटकर, प्रास्ताविक मदन मोडक यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 26/Mar/2025