मंडणगड : मंडणगडमधील आंबडवेत सुरू असलेले केंद्र व राज्याचे विकासाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळण्याची आवश्यकता असल्याचे सद्याच्या एकूणच विकासाच्या कार्यपद्धतीवरून दिसते. याच विषयावर मागील महिन्यात मंत्रालयात मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीचे फलित काय, हा प्रश्न विकासाबाबत कार्यवाही दिसून येत नसल्याने उपस्थित होतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव पाहण्यासाठी देशभरातून लोकांची वर्दळ आंबडवेत नेहमीच पाहायला मिळते. वाहतूक व्यवस्थेच्या सुलभतेमुळे येथील ओघ अधिकच वाढला आहे, यंदाच्या माता रमाई जयंतीनिमित्त आंबडवेला भेट देणाऱ्या अनुयायांची संख्या फार मोठी होती.
आंबडवेचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रपती, राज्यपाल, केंद्र व राज्यातील अनेक मंत्र्यांनी या गावाला भेट दिली आहे. येथील विकासाबाबत म्हणायचे झाल्यास वेळोवेळीच्या राज्यकत्यांनी सकारात्मक प्रयत्न केले आहेत. शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामेही करण्यात आली आहेत. आंबडवेत बाबासाहेबांची साजरी होणारी जयंती शासनाच्या माध्यमातून साजरी करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन वर्षांपूर्वी घेतला. तेव्हापासून आंबडवेत बाबासाहेबांची शासकीय जयंती साजरी केली जाते.
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनीही आंबडवेच्या विकासाबाबत सकारात्मक भूमिका मांडली असून ते विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. केंद्र सरकारने येथील महत्व लक्षात घेऊन विकासासंदर्भात दखल घेत आंबडवेचा समावेश संसद आदर्श ग्राम योजनेत केला. या योजनेच्या माध्यामतून राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांचे खूप चांगले प्रयत्न सुरू आहेत. या योजनेतून आंबडवे ते राजेवाडी या प्रशस्थ रस्ते मार्गाचे काम पूर्णत्वास जात आहे, या मार्गामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे तर झाले आहेच, शिवाय तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने चांगली दिशा मिळाली आहे. संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून उत्तम बृहत आराखडा तयार करण्यात आला. मात्र या आराखड्यातील एखादे, दुसरे काम सोडल्यास अनेक कामे झालेली नाहीत. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पना केवळ आराखड्यात न राहता प्रत्यक्षात कामांना गती मिळण्याची आवश्यकता निर्माण होते. किंबहुना राज्यकर्त्यांची त्यास सकारात्मक साथ मिळण्याचे अपेक्षित आहे.
आंबडवे गावात बाबासाहेबांचे भव्य दिव्य स्मारक, शिल्पसृष्टी, वाचनालाय, बाबासाहेबांशी संबंधीत वस्तु संग्राहलय, न्याहरी व राहण्याची व्यवस्था, वाहनतळ आदी बाबींचा या आराखड्यात समावेश आहे. तूर्तास या बाबी केवळ आराखड्यातच आहेत. विकासासाठी येथील ग्रामस्थ सहकार्य करण्यास नेहमीच तयार आहेत. त्यामुळे सार्वत्रिक प्रयत्नांनी आंबडवे एक आदर्श शहराप्रमाणे विकसित होऊ शकते. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सकारात्मक प्रयत्नांना गती मिळण्याची आवश्यकता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 26/Mar/2025














