रत्नागिरी : गेल्या काही दिवसांमध्ये कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना अपेक्षित मासळीच मिळत नसल्याने मासळी बाजारात माशांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे माशांचे दर वधारलेले आहेत. सध्या खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी स्थिती मच्छीमारांची झाली आहे. त्यामध्ये मत्स्यविभागाकडून ड्रोनची गस्त सुरू केल्यामुळे मच्छीमारांना दहा वावाच्या आतमध्ये येऊन मासेमारी करता येत नसल्याने आणखीनच अडचण झाली आहे. जिल्ह्याच्या हद्दीत येऊन मासेमारी करणाऱ्या परप्रांतीयांच्या घुसखोरीची भर पडली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार उपाशी आणि परप्रांतीय तुपाशी अशी स्थिती आहे.
जिल्ह्यात मिरकरवाडा आणि हर्णे ही दोन मोठी बंदरे आहेत. उर्वरित छोट्या मोठ्या बंदरातून माशांची उलाढाल थोड्याफार प्रमाणात होत असते. गेले महिनाभर नैसर्गिक कारणांसह मानवनिर्मित अडचणींना मच्छीमार सामोरा जात आहे. मासे कमी मिळत असल्याने मच्छीमारांची अवस्था बिकट आहे. मासेमारीसाठी गेलेल्या नौकांचा इंधनाचा खर्च अधिक होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मत्स्यखात्याच्या कारवाईच्या भीतीने मिरकरवाडा बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात जाणारा मच्छीमार काळजीपूर्वक रवाना होत आहे.
किनारी भागात होणाऱ्या मासेमारीला बऱ्यापैकी आळा बसलेला आहे. मत्स्यविभागाकडून आतापर्यंत सुमारे २८ नौकांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांना १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर जावे लागते तर ट्रॉलिंगलाही किनाऱ्यापासून दहा वावात येता येत नाही. त्यांच्यावर ड्रोनची नजर असते. आधीच मासे मिळत नाहीत त्यात नियम मोडण्याचे धाडस केलेच तर दंड भरावा लागतो. त्यामुळे रिपोर्ट मिळत नसले तर मच्छीमार नौका बंदरात उभ्या करून ठेवत आहेत. गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांचीही अवस्था बिकट आहे. गेले महिनाभर त्यांच्या जाळ्यात मासळीच मिळत नाहीये. अनेक गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांनी मासेमारी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काहींनी पुढील महिन्यात रामनवमीनंतर काही दिवस पॅकअप करण्याची तयारी दर्शवली आहे.
गेले महिनाभर किनारी भागात मासाच मिळत नसत्याने अडचण झाली आहे. नौका समुद्रात जात नाहीत. उदरनिर्वाहासाठी पर्यायी व्यवसायांचा विचार करावा लागत आहे. मासे कमी असल्याने दर अधिक मिळतो; मात्र त्यासाठी मच्छीमारांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. श्रीदत्त भुते, मच्छीमार, गिलनेट
टॉलिंगद्वारे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना पाहिजे तेवढा मासा मिळत नाही. अनेक नौका बंदरावर उभ्या करून ठेवलेल्या आहेत. – शराफत गडबडे, मच्छीमार, जयगड
मस्त्य विक्रेत्या महिलांची परवड
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरामधून रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर या तालुक्यात प्रामुख्याने शेकडो आठवडा बाजारांसाठी मासळी जाते. सध्या अशा असंख्य महिलांना विक्रीसाठी मासळी मिळत नाही. मिळाली तर त्याचे दर अधिक असतात, त्यामुळे खरेदी करताना त्यांना विचार करावा लागतो. ग्रामीण भागात जास्त रक्कमेने खेरेदी करणारा ग्राहक मर्यादित आहे तसेच किनारी भागातील मच्छीविक्रेत्या काही महिलांनी कालवं विकून उदरनिर्वाह करण्याचा मार्ग निवडला आहे.
माशांचे दर चढेच!
नौकांना मिळणाऱ्या म्हाकूळ माशाचा दर २०० ते ४०० रुपये किलो तर बांगड़ा ३२ किलोचा टप काऊंटनुसार १८०० ते ५००० रुपयांनी विकला जात आहे. मिरकरवाडा बंदरात किलोमागे सुरमईचा दर ४०० ते ७०० रुपयापर्यंत आहे. सरंगा, पापलेट ५०० ते ८०० पर्यंत, टायगर झिंगा मात्र १००० च्या वर पोहचला आहे, मात्र चविष्ट सौंदाळेचा दर ३०० रुपये किलो असल्याने तो परवडणारा आहे. रत्नागिरीतील खवय्यांना मासे कमी मिळत असल्याने त्यांची घालमेल सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 27/Mar/2025














