Maharashtra Weather Update: अवकाळीचे ढग आणखी गडद होणार? पुढील पाच दिवस धोक्याचे..; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

अशातच राज्यात उष्णतेच्या पारा दिवसागणिक वाढत असताना चंद्रपूर, लातूर, संभाजीनगर, सांगलीसह अनेक भागामध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दुसरीकडे लातूर, बीड, धाराशिव याठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून यादरम्यान विजांचा कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाजा आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ होत असल्यामुळं दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. तर पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होत असताना हवामान खात्याकडून याबद्दलचा मोठा इशारा देण्यात आलाय. परिणामी अवकळी पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रादेशिक हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

अवकाळीचा तडाखा, शेतकऱ्यांचे नुकसान

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ उतार दिसत आहेत. उष्णतेच्या लाटेनंतर हवामान विभागाने सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा अलर्ट दिला होता. मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून टरबूज बागा मातीमोल झाली आहेत. सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अवकाळी पावसाने काही भागांमध्ये हजेरी लावली. सांगलीत मुसळधार पावसाने वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. या तिन्हीही जिल्ह्यात बागायतदारांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 28-03-2025