चिपळूण नगरपरिषदेची ६४ टक्के वसुली

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेने मार्चअखेर मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत मालमत्ता करापोटी १८ कोटी ३३ लाख ८१ हजार ५३१ रुपयांपैकी एकूण निव्वळ ११ कोटी ८८ लाख ७४ हजार ३०५ रुपये इतकी म्हणजेच ६४ टक्के वसुली झाली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला त्यांच्यासमवेत प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, बापू साडविलकर उपस्थित होते. महावितरण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि पोलिस विभाग यांच्याकडून १ कोटी २० लाख ९२ हजार २९४ रुपयांची थकबाकी आहे. यातील महावितरणचे ३५ लाख मिळतील. परंतु, शिक्षण व पोलिस विभागातील निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव नगरपरिषदेने शासनाकडे पाठवला असल्याची माहिती मुख्याधिकारी भोसले यांनी यावेळी दिली.

त्याचबरोबर पाणीपट्टीची मागणी वसुली ४ कोटी २३ लाख १० हजार ३९२ इतकी आहे. त्यापैकी २ कोटी ६ लाख ४४ हजार ६३६ रुपये म्हणजे ४८ टक्के इतकी वसुली झाली आहे. यामध्ये २ कोटी ९५ लाख रुपयांची वसुली ही जुनी वसुली असल्याचे मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले.

जप्त मालमत्तांचा लिलाव
चिपळूण नगरपरिषदेने आतापर्यंत ५९ लोकांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्याची किंमत १ कोटी १७ लाख ६९ हजार ७१६ रुपये इतकी आहे. आजपर्यंत नगरपरिषद मालमत्ता जप्त करीत होती. मात्र, पुढील कार्यवाही काहीच होत नव्हती; परंतु आता ज्या मालमत्ता जप्त केल्या गेल्या आहेत, त्यांचा लिलाव केला जाईल, असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 28/Mar/2025