रत्नागिरी, दि. 28 : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा ही पीडित व्यक्ती व न्यायालय यामधील महत्त्वाचा घटक आहे. पोलीसांनी त्यांची भूमिका काटेकोरपणे व सचोटीने पार पाडावी, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.
चिपळूण तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व तालुक्यातील सर्व पोलीस ठाणी यांच्या संयुक्त विद्यमाने काल चिपळूण जिल्हा न्यायालय -1 येथे विविध महिलांविषयक कायद्यांचे जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे म्हणाल्या, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा ही पीडित व्यक्ती व न्यायालय यामधील महत्त्वाचा घटक आहे. पोलीसांनी त्यांची भूमिका काटेकोरपणे व सचोटीने पार पाडावी. महिलांविषयक असलेल्या महत्त्वपूर्ण कायद्यांची माहिती देताना बालकांचे लैंगिक आत्याचारांपासून संरक्षण कायदा, सायबर गुन्हे, डिजिटल अरेस्ट, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, विविध कायद्यातील सुधारणा तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण न्यायनिवाडे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
दिवाणी न्यायाधीश व. स्तर पी. आर. कुलकर्णी यांनी प्रास्तविकात, त्यांनी ८ मार्च या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मार्च महिन्यात विविध स्तरांवर महिलांविषयक विविध उपक्रम राबावले जातात व त्यापैकीच एक स्तुत्य उपक्रम म्हणजे चिपळूण तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशाने विविध योजनांतर्गत अॕसिड हल्ला पीडित महिला तसेच लैगिंग शोषण पीडित महिला यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी गठित केलेल्या समितीमार्फत मनोधैर्य योजनेव्दारे आर्थिक मदत दिली जाते व त्यांचे पुनर्वसन केले जाते याबाबत सविस्तर माहिती दिली.
सह दिवाणी न्यायाधीश. एम. आर. काळे यांनी, विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी असणाऱ्या कायद्यातील विविध सुधारणा, त्यांना पुरवल्या जाणाऱ्या कायदेविषक सेवा तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये बालकांना कायदेशीर मदत मिळण्याकरिता स्थापन केलेले स्पेशल युनिट याबाबत सविस्तर माहिती दिली. वकील संघाच्या उपाध्यक्ष नयना पवार यांनी हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देताना कायद्यातील सुधारणा व शासनाच्या विविध योजना याबाबत माहिती दिली. तसेच विधिज्ञ स्नेहल मोहिते यांनी अठरा वर्षाखालील बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांची वाढती संख्या, पालकांची जबाबदारी आणि पोलीसांची भूमिका याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच महिला संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन करताना, न्याययंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील दुवा म्हणजे संरक्षण अधिकारी असून, कायद्याच्या तरतुदींची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला चिपळूण तालुक्यातील सर्व महिला पोलीस, वकील व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन वरिष्ठ लिपीक सारिका शिर्के यांनी तर, सूत्रसंचालन कनिष्ठ लिपीक निनाद कोतवडेकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 28-03-2025
