सलोखा योजना : रत्नागिरी जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांनी केली जमिनीची आदलाबदल

रत्नागिरी : शासनाने शेतकऱ्यांसाठी अतिशय सुलभ अशी ‘सलोखा’ योजना लागू केली आहे.

या योजनेंतर्गत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे करत शेतजमीन अदलाबदल करता येते. या दस्तासाठी मुद्रांक शुल्क एक हजार रुपये व नोंदणी शुल्क एक हजार रुपये आकरले जाते. जिल्ह्यातील २८ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सिंधुदुर्गातील ३६ जणांनी हा लाभ घेतला असून, राज्यात सुमारे १ हजार ११९ शेतकऱ्यांनी सलोखा योजनेंतर्गत जमीन अदलाबदल केली आहे.

यात शेतकऱ्यांच्या १० कोटी ५ लाख रुपयांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काची बचत झाली. सर्वाधिक ८४ शेतकऱ्यांची नोंदणी परभणी व बुलढाणा जिल्ह्यात झाली. ही योजना ३१ जानेवारीला संपुष्टात आली. शेतजमिनीचे वाद टाळण्यासाठी व आपापसांत सलोखा निर्माण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही योजना जानेवारी २०२३ मध्ये अंमलात आणली. यात सहभागी होण्यासाठी पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असावा, अशी अट घातली होती. रत्नागिरी जिल्ह्यात याला प्रतिसाद मिळाला. मुद्रांक शुल्क विभागाने याला दुजोरा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 28-03-2025