कोकणचा राजा महागला; डझनाला ८०० ते १६०० रुपये दर

रत्नागिरी : अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल वातावरणाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. यंदा हापूसचे उत्पादन कमी आले आहे. त्यामुळे याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहेत. बाजारात ८०० ते १६०० रुपये डझनने हापूस आंब्याची विक्री केली जात आहे. यंदाच्या वर्षी जेमतेम २५ ते ३० टक्के आंबा उत्पादन झाले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णते प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. शिवाय फळे भाजली असून फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे तयार आंबा शेतकरी विक्रीसाठी मुंबई पुणे बाजारात पाठवत आहे. आवकही वाढल्याने स्थानिक बाजारातही आंबा विक्रीसाठी येऊ लागला असला तरी स्थानिक बाजारपेठेतील दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत कच्चा व तयार दोन्ही प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पिकलेल्या आंब्याला कच्च्यापेक्षा डझनाला १०० ते २०० रुपये जास्त मोजावे लागत आहे. कच्च्यापेक्षा पिकलेल्या आंब्याला वाढती मागणी असून चार ते पाच डझनाच्या लाकडी पेटी ऐवजी विक्रेत्यांकडे एक ते दोन डझनाच्या पु‌ठ्याचे बॉक्स उपलब्ध आहेत त्यामुळे ग्राहकाला आंब्याची वाहतूक करणे सोपे जात आहे.

स्थानिक बाजारपेठेत सध्या हापूस ८०० ते १६०० रुपये डझन आहे. हा दर सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. चड्या दरामुळे बाजारात हापूस खरेदीचे प्रमाण कमी आहे. शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या काही चाकरमान्यांनी किरकोळ स्वरूपात आंब्याची खरेदी केली. सध्या पायरीलाही हापूस प्रमाणेच चांगला दर असल्याचे दिसून येत आहे पायरी आंब्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आंबा अजूनही सर्वसामान्यांपासून दूरच आहे.

आंबा निर्यातीत रत्नागिरी देशात अव्वल
यंदाच्या हंगामातील पहिल्यांदा हापूस आणि केशर आंबा युरोपीय बाजारात निर्यात करण्यात आला आहे. सरकारच्या मंगोनेट या प्रणालीद्वारे देशातील निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झाली असून देशात महाराष्ट्र राज्य अव्वल असून राज्यात १७ हजार ६९१ शेतकऱ्यांनी नोंदणी केले आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील ६.९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी करत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे निश्चितच देशातील सर्वात जास्त आंबा उत्पादन आणि निर्यात महाराष्ट्र राज्यतून अर्थात रत्नागिरी जिल्ह्यातून होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 29/Mar/2025