चिपळूण : नगर परिषदेने आतापर्यंत जप्त केलेल्या ५९ मालमत्तांचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. नगर परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच धडक कारवाई आहे. वसुलीचा टक्का वाढवण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. लिलाव होणाऱ्या मालमत्तांमध्ये सदनिकांचा समावेश आहे. आतापर्यंत मालमत्ता व पाणी योजनेची मिळून १३ कोटी ९५ लाख १८ हजार ९४१ रुपयांची वसुली झाल्याची माहिती गुरुवारी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, नगर परिषदेला यावर्षी मालमत्ता करातून थकित व चालू वर्षाची मिळून १८ कोटी ३३ लाख ८१. हजार ५३१ रुपये, तर पाणी योजनेतून थकित व चालू वर्षांची मिळून ४ कोटी २३ लाख १० हजार ३९२ रुपयांची वसुली अपेक्षित आहे.
त्यापैकी आतापर्यंत मालमत्तांची ११ कोटी ८८ लाख ७४ हजार ३०५ रुपये वसुली झाली असून त्याची टक्केवारी ६४.८२ आहे. पाणी योजनेची २ कोटी ६ लाख ४४ हजार ६३६ रुपये वसुली झाली असून ती ४८ टक्के झाली. मात्र वसुली करताना काही मालमत्ताधारक अनेक वर्षांपासून कर भरण्यास तयार नाहीत. त्यांना अनेकदा नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यालाही प्रतिसाद न दिल्याने ५९ जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
यानंतर त्यांना कर भरण्याची अंतिम नोटीस देण्यात आली. त्यालाही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आता या मालमत्तांचा नियमानुसार लिलाव केला जाणार आहे. या जप्त मालमत्तांमधून १ कोटी १७ लाखाची वसुली अपेक्षित आहे. त्यामुळे त्यानुसार बोली लावली जाणार आहे. यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 29/Mar/2025














