रत्नागिरी रेल्वेस्थानकावर अल्प दरातील वातानुकूलित प्रतीक्षा कक्षाचे उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वातानुकूलित आलिशान प्रतीक्षा कक्षाचे (एसी एक्झिक्युटिव्ह लाउंज) उद्घाटन शनिवारी संध्याकाळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

एमआयडीसीला लागून असलेल्या रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी येत्या महिन्याभरात सामंजस्य करार केला जाईल. जगातील चांगली रेल्वेस्थानके कोकणात तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करू या, असे प्रतिपादन श्री. सामंत यांनी यावेळी केले. रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीच्या माध्यमातून ४० कोटी रुपये देण्यात आले असून, गरज पडल्यास आणखी पाच ते दहा कोटी रुपयेही देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. रायगडमधील रोहा, रत्नागिरीतील चिपळूण आणि खेड, तसेच सिंधुदुर्गातील कुडाळ अशा एमआयडीसीला लागून असलेल्या रेल्वेस्थानकांच्या विकासासाठीही येत्या महिन्याभरात सामंजस्य करार केला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले. स्थानकांवर स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्या दृष्टीने आवश्यक ते सातत्यपूर्ण प्रयत्न कोकण रेल्वेने करावेत, तसेच स्थानकांवरच्या कामांसाठी किंवा दुकानांसाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही सामंत यांनी केल्या.

महिला बचत गटांच्या उत्पादनांचा ब्रँड तयार करण्याची गरज आहे; मात्र ती उत्पादने घेण्याची खात्री कोकण रेल्वेने दिली पाहिजे. तसेच, पन्हे, कोकम सरबत, काजूच्या बोंडांचे सरबत यांसारखी स्थानिक उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली.रेल्वेच्या केवळ वातानुकूलित वर्गातूनच नव्हे, तर कोणत्याही वर्गातून प्रवास करणारा प्रवासी ताशी फक्त पन्नास रुपये शुल्क देऊन या कक्षाचा वापर करू शकणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी या वेळी दिली. अशा प्रकारचा विमानतळासारखा प्रतीक्षा कक्ष सुरू झालेले रत्नागिरी हे कोकण रेल्वेमार्गावरचे सातवे, तर महाराष्ट्रातील तिसरे स्थानक ठरले आहे. याआधी चिपळूण आणि खेड या रेल्वेस्थानकांवर अशा प्रकारचा कक्ष सुरू झाला आहे.

या वेळी माजी आमदार संजय कदम, कोकण रेल्वेचे कार्ययोजना आणि वाणिज्य संचालक सुनीलकुमार गुप्ता, कोकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट, मिरजोळ्याचे उपसरपंच अशोक विचारे, सचिन वहाळकर आदी उपस्थित होते.

या वेळी रत्नागिरीतील कलासार्थ समूहाच्या गौरी साबळे, राणी धनावडे, वैष्णवी साळवी, मधुरा कांबळे, ऋता तोडणकर, आस्था खेडकर, रोहित शिंदे, हृतिक कदम व विनीत सनगरे या कलाकारांनी दिवली नृत्य हा लोककला प्रकार सादर करून वाहवा मिळवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 31-03-2025