खेड : बोरज धरण परिसरात घातक घनकचरा

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या घातक घन कचऱ्याची विल्हेवाट धोकादायक पद्धतीने लावली जात आहे. बोरज गावातून अशा प्रकारांची तक्रार उपविभागीय अधिकारी व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे करण्यात आली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरज धरणाच्या परिसरात एका खासगी डोंगर भागात रासायनिक कारखान्यांमधून आणलेला घातक घनकचरा आणि राख टाकण्यात आल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे करण्यात आली आहे.

हा प्रकार अनोळखी व्यक्तीने धरणाच्या तलावापासून काही अंतरावर केल्याची चर्चा असून, पावसाळ्यात या रसायन मिश्रित घनकचऱ्यातून पावसाच्या पाण्यासोबत बोरज धरणात रसायन मिसळून पेयजल दूषित होण्याचा धोका आहे.

याबाबत स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळासोबतच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. धरण परिसरात घातक रासायनिक कचरा टाकल्याची बाब समोर आल्यानंतर या धरणाचे पाणी जे शहरवासीय पितात त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 01/Apr/2025