सावर्डे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : सावर्डे (ता. चिपळूण) येथील वालावालकर हॉस्पिटल डेरवण कॅम्पसमधील बाईज हॉस्टेलमध्ये एका 18 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 02 एप्रिल 2025) सकाळी 9:00 ते दुपारी 1:00 च्या दरम्यान घडली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी बी.एन.एस.एस. 194 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव रोहन संदीप धाग्रा (वय 18) असे आहे. तो मूळचा तुरंबव पालेवाडी (ता. चिपळूण) येथील रहिवासी असून, सध्या वालावालकर हॉस्पिटल डेरवण कॅम्पसमधील कृतमाला बिल्डिंग, बाईज हॉस्टेलच्या खोली क्रमांक 105 मध्ये राहत होता. रोहन हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. घटनेच्या दिवशी तो कॉलेजला गेला नसल्याने त्याचे मित्र पार्थ आणि शुभम यांनी ब्रेकदरम्यान त्याच्या खोलीवर जाऊन पाहिले.

रोहनने खोलीचा दरवाजा उघडला नाही, म्हणून मित्रांनी जोरात दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. रोहनने नायलॉनच्या दोरीने सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती. मित्रांनी तातडीने डेरवण हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी रोहनला तपासले असता त्याला मृत घोषित केले. ही घटना दुपारी 4:20 वाजता पोलिसांत नोंदवण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 03-04-2025