दापोली : कर्दे गावच्या विकासासाठी १४ कोटी २ लाखाचा निधी

दापोली : राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातील पर्यटकांसाठी कर्दे किनारा प्रमुख आकर्षण ठरत आहे. त्या परिसरात अधिक सोयीसुविधा दिल्या तर पर्यटकांमध्ये वाढ होईल आणि रोजगार संधीही निर्माण होतील. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सादर केलेला कर्दे गावाच्या विकासासाठी राज्य शासनाने १४ कोटींचा निधी ग्रामविकास विभागाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास निधीतून दिला आहे. त्याचबरोबर त्या कामांना प्रशासकीय मंजूरीही दिली आहे.

कोकणातील ग्रामीण भागातील भुमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकास कामांची गती वाढविण्यासाठी ‘कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम’ योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून कर्दे (ता. दापोली) येथील विविध कामांसाठी १४ कोटी २ लाखांचे विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्याला नुकतीच शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मंजूर निधी त्या-त्या वेळी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही कामे सुरू करण्यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून घेण्यात आलेली नाहीत याची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खात्री करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर तातडीने कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार अंदाजपत्रके तयार करणे, तांत्रिक मंजुरी, निविदा काढणे व स्वीकारणे, कार्यारंभ आदेश देणे आदी कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्याकडून करून घ्याव्यात, असे आदेशही देण्यात आले आहेत.

कर्देसाठी मंजूर निधीमधून कोटी ५० लाख ३३ हजार रुपये कर्दे खाडीवर पूल बांधण्यासाठी, खाडी किनारी संरक्षक बंधाऱ्यासाठी १३ कोटी ७९ लाख २७ हजार रुपये, करें येथील दुकाने व फेरिवाले झोन बांधण्यासाठी ३६ लाख रुपये, साहसी क्रीडा उद्यानाचे बांधकाम करण्यासाठी ४५ लाख, जलक्रीडा उपकरणे ठेवण्यासाठी केंद्र उभारणे ३० लाख, आरसीसी वाँच टॉवरसाठी ३० लाख, तरंगत्या जेट्टीसाठी २५ लाख, समुद्र किनारी सांस्कृतिक संकुलासाठी २ कोटी ८९ लाख, दिशादर्शक फलकांसाठी ५ लाख, खेम मंदिराच्या सुशोभीकरणासाठी २५ लाख, मंदिराच्या बांधकामासाठी ४५ लाख ३१ हजार, गिम्हवणे रस्त्यासाठी १ कोटी ३० लाख, जाधववाडी रस्ता बांधकामासाठी १५ लाख, स्वयंचलित फुड कंपोस्ट आणि प्लास्टिक ग्रेडिंग मशीनसाठी ४७लाख ५० हजार, मोबाईल टॉवरसाठी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत.

ग्रामीण पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटन करण्यात आली आहे. २०१५ पासून ग्रामपंचायतीने विकास आराखडा तयार करून ठेवला होता. त्याचा डीपीआरही बनविलेला होता. त्याचे शासनाकडे सादरीकरणही केले होते. ग्रामस्थांना नक्की काय पाहिजे, ते या आराखड्याद्वारे मांडले होते. या कामांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पर्यटनातून रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत – सचिन तोडणकर, सरपंच, कर्दे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 04/Apr/2025