वैभववाडी : सेंट्रल सॉल्ट अॅन्ड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (भावनगर गुजरात) सहकायनि आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चार ठिकाणी समुद्री शेवाळ शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
त्यामुळे बहुविध उपयोगी समुद्री शेवाळची व्यावसायिक शेती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे कोकणातील एकूणच पीक पॅटर्न अडचणीत आले असताना हा नवा आशेचा किरण तयार झाला आहे.

देशात १९१९ पासून ५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी विकास दिवस म्हणून साजरा केला जातो. कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. मासेमारी, पर्यटन अशा अनेक अंगाने समुद्रावर हजारो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे; परंतु त्यासोबत आता आणखी एक नवीन संधी मच्छीमार आणि स्थानिकांना उपलब्ध होणार आहे. समुद्री शेवाळपासून अनेक बहुविध उत्पादनांची निर्मिती केली जाते.
देशांतर्गत अनेक कंपन्यांना या उत्पादनाची गरज असून, सध्या ती आयात करावी लागतात. देशात तमिळनाडू येथेच समुद्री शेवाळ केली जाते. मात्र, या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेवून केंद्राने पंतप्रधान मस्त्यसंपदा योजनेतून समुद्री शेवाळ शेती कुठे होऊ शकते, याचे सर्वेक्षण सुरू केले होते.
सेंट्रल सॉल्ट अॅन्ड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट (भावनगर गुजरात) या संस्थेच्या सहकार्याने आणि स्थानिकांच्या पुढाकाराने कोकणातील दहा ठिकाणांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील पाच ठिकाणे प्रात्यक्षिकांसाठी पोषक ठरली. यामध्ये सिंधुदुर्गातील हिंदळे, मुणगे, तांबळडेग (ता. देवगड) रत्नागिरी जिल्ह्यातील बुरुंडी (ता. दापोली), काळबादेवी (ता. रत्नागिरी) यांचा समावेश आहे. साधारणपणे नोव्हेंबर २०२४ पासून जागा निश्चित केलेल्या समुद्रात प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. हिंदळे मोरवे येथे शेखर राणे यांनी पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी तिन्ही टप्पे यशस्वी झाले आहेत. जिल्ह्यातील मुणगे आणि तांबळडेग या दोन ठिकाणी पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी झाला आहे.
येथील जबाबदारी मंदार सनये, यश मालणकर, मारुती धुवाळी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बुरुंडी आणि काळबादेवी येथे देखील हा प्रयोग झाला. सर्व ठिकाणी सुरुवातीला बारा मीटर लांबीच्या बारा ट्युब समुद्रात निश्चित केलेल्या ठिकाणी सोडण्यात आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:38 PM 05/Apr/2025














