लांजा : तालुक्यातील पन्हळे फाटा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एका पाठोपाठ दोन ट्रक धोकादायक स्थितीत उभे केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेनंतर काही वेळातच याच ठिकाणी आणखी एका ट्रक चालकाने आपला ट्रक रस्त्यात धोकादायकपणे उभा केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिम हसन मुजावर (पोहकॉ/१४२८, नेमणुक लांजा पोलीस ठाणे) यांनी यासंदर्भात दुसरी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ०४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास पन्हळे फाटा समोर मुंबई-गोवा महामार्गावर आरोपी रोहित हरदवाल कुसवाहा (वय २२ वर्षे, सध्या रा. कुक्कुटपालन लांजा, मूळ रा. बरवा महादेवा, ता. घाटा, जि. कुसीनगर, राज्य – उत्तरप्रदेश) याने त्याचा मालकीचा डंपर (क्रमांक RJ-१९-GJ-२७०२) रस्त्यात उभा केला होता.
हा डंपर अशा स्थितीत लावण्यात आला होता की, ज्यामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांना आणि इतर वाहनांना धोका निर्माण होऊ शकला असता, तसेच वाहतुकीसही अडथळा झाला होता. यामुळे रहिम मुजावर यांनी लांजा पोलीस ठाण्यात आणखी एक तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारावर लांजा पोलिसांनी आरोपी रोहित हरदवाल कुसवाहा याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी दोन ट्रक धोकादायक स्थितीत आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 05/Apr/2025














