चिपळूण : चिपळूण पालिकेने सुरू केलेल्या वाचू आनंदाने या उपक्रमाची रविवारी सकाळी देव गांधारेश्वर मंदिर परिसरात सुरवात झाली. शालेय विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध नागरिक आणि शासकीय अधिकारी तब्बल दोन तास वाचनात दंग झाले होते. मोबाईल बाजूला ठेवून नवी पिढी वाचनाकडे वळावी, यासाठी पालिकेने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सहयोगाने हा उपक्रम सुरू केला आहे. पहिल्या दिवशी १५६ नागरिक त्यात सहभागी झाले.
मुख्याधिकाऱ्यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील हेतू सांगितला. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन काही दिवसापूर्वी चिपळूणला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय रौप्य महोत्सवी वर्षाच्या प्रारंभ कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी वाचन संस्कृती टिकावी, यासाठी तुम्ही काही उपक्रम राबविला तर तो मलाही सांगा, मी ही आमच्या भागात असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितले होते. ग्रंथालयात, कपाटात असणारी पुस्तके नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजेत या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
साहित्यिक, विचारवंत प्रकाश देशपांडे यांनी अत्यंत समर्पक शब्दात जीवनात वाचन किती आवश्यक आहे, हे सांगितले. मोबाईलमध्ये अडकलेल्या नव्या पिढीला यातून बाहेर काढून वाचनाकडे वळवण्यासाठी सर्वांनी वाचू आनंदाने या उपक्रमाला सहकार्य करायला हवं, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमात प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरेही सहभागी झाले आणि वाचनात दंग झाले. लिगाडे यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थी पालकांना पटवून दिले. वाचनामुळेच मी घडलो. वाचनामुळेच, अभ्यासामुळेच एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलो, असेही त्यांनी सांगितले.
लॉकडाउनच्या काळात अनेक पुस्तक वाचली. त्याचा आज फायदा होत आहे, असे सांगताना किमान रोज ३० पाने वाचा, नियमित चाला, आरोग्याची काळजी घ्या, फळे खा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. दुसरा उपक्रम १३ एप्रिलला सकाळी ८ ते १० या वेळेत सानेगुरूजी उद्यानात आयोजित करण्यात आला आहे.
हा वाचनाचा उपक्रम सुरू केला आहे. पालिकेच्या या उपक्रमांना आता सर्व नागरिकांनी साथ देण्याची गरज आहे- बापू काणे, माजी उपनगराध्यक्ष, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 07/Apr/2025














