‘दापोली समर सायक्लोथॉन’चे ११ ते १२ मे दरम्यान आयोजन

दापोली : दापोली सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित ‘दापोली समर सायक्लोथॉन २०२५’ च्या सातव्या पर्वाचे आयोजन ११ व १२ मे २०२५ रोजी सोहनी विद्यामंदिरच्या मैदानावर करण्यात आले आहे. या सायकल स्पर्धेत १५० किलोमीटर सायकल चालवण्याचे मुख्य आणि रोमांचक आव्हान असणार आहे. सायकल संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि लोकांमध्ये सायकलिंविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून अनेक नामांकित सायकलस्वार आपल्या कुटुंबियांसोबत दापोलीत दाखल होणार आहेत.

ही सायकल स्पर्धा विविध गटांमध्ये रंगणार आहे. यात ३० आणि ५० किलोमीटरचा ‘कोस्टल सिनिक रूट’, ४ ते १५० किलोमीटरचा ‘शॉर्ट सिटी लूप’ आणि १ व २ किलोमीटरची ‘फन राईड’ यांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘शॉर्ट सिटी लूप’ मार्गावर ५०, ७५, १००, १२५, १५० किलोमीटर सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे २००, ३००, ४००, ५०० आणि ६०० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त इतरही खास बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धकांना १२ तासात १५० किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल.

५० किलोमीटरचा ‘कोस्टल सिनिक रूट सायक्लोथॉन’ मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली येथून सुरू होऊन आसूद, सालदुरे, पाळंदे, बायपास रोड, आंजर्ले पूल, अडखळ, पाजपंढरी, हर्णेमार्गे दापोली असा निसर्गरम्य समुद्रकिनारपट्टीवरून जाईल. या संपूर्ण मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो आणि वैद्यकीय मदत उपलब्ध असेल, त्यामुळे स्पर्धकांना सुरक्षित आणि आनंददायी अनुभव घेता येईल.

‘फन राईड’ सर्वांसाठी विनामूल्य असून इतर राईडसाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धक खालील लिंकवर ऑनलाईन नोंदणी करू शकतातः https://www.townscript.com/e/dsc7. तसेच, ऑफलाईन नोंदणीसाठी विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ आणि दत्ता मोबाईल कामगार गल्ली येथे नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत. नोंदणी करण्याची अंतिम तारीख ५ मे २०२५ आहे. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७ आणि ९०२८७४१५९५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दापोली सायकलिंग क्लबने सर्वांना या रोमांचक स्पर्धेत सहभागी होण्याचे आणि आपल्या कुटुंबासोबत सायकल चालवण्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जास्तीत जास्त अंतर सायकल चालवून या उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 09/Apr/2025