खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात अवघड आणि अपघातप्रवण मानल्या जाणाऱ्या भोस्ते घाटात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत, या संदर्भात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी माहिती दिली.

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह व जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ९ रोजी शासनाच्या शंभर दिनी कार्यक्रमांतर्गत खेडमधील शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या व उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार सुधीर सोनवणे, पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांना सूचना केल्या. यावेळी त्यांनी खेड प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे आदी कार्यालयांची पाहणी केली. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह म्हणाले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक झाली.
या बैठकीत माझ्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी देखील उपस्थित होते. भोस्ते पाटातील गंभीर परिस्थितीची सविस्तर माहिती यावेळी ना. कदम यांना देण्यात आली. मंत्री कदम यांनी शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
भोस्ते घाट हा खेड तालुक्यातील सर्वात कठीण आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. येथे अनेक वेळा जीवघेणे अपघात घडले आहेत. रस्त्याच्या अरुंदतेमुळे, तीव्र वळणांमुळे आणि सुरक्षिततेच्या उपायांची कमतरता यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे.
महामार्गावरील वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मिळाल्यामुळे भोस्ते घाटातील अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल. शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत येथील शासकीय कार्यालयांच्या समस्या सोडवून दर्जेदार सेवा नागरिकांना देता याव्यात, यासाठी प्रत्येक कार्यालयाला लागणारा निधी देण्यात आला आहे. येथील अधिकारी देखील लोकाभिमुख कामकाज करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नक्कीच कायदा व सुव्यवस्था राखणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 11/Apr/2025














