चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गालगत फेरीवाल्यांचे बस्तान

चिपळूण : चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर फेरीवाल्यांनी तसेच हातगाडी चालकांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. चिपळूण शहरातील अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेने काही दिवसांपूर्वी कारवाई केली.

त्यानंतर गोवळकोट भागातील रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केली. पालिकेची ही कारवाई महिन्यापासून चालू आहे; मात्र मुंबई-गोवा महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना आणि हातगाडीचालकांना मात्र पालिकेने अभय दिले आहे. पालिका शहरात व्यवसाय करू देत नाही म्हणून काही जण जाईल.

महामार्गालगत व्यवसाय करत आहेत. काविळतळी मार्कंडी भागातही रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुख्याधिकारी यांच्या घरासमोर रस्त्यालगत भरणारा भाजीबाजार आता मार्कंडीतील प्रभातरोड परिसरात हलविण्यात आला आहे. येथील पेट्रोलपंपाच्या समोर चारचाकी वाहने लावून विक्रेते फळ, भाजी आणि इतर साहित्य विकतात. डीबीजे कॉलेजच्या परिसरात काहींनी हातगाड्या लावल्या आहेत. पावसाळ्यात एका हातगाडीवर संरक्षण भिंत कोसळून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर या हातगाड्या हटविण्यात आल्या; मात्र तिथे आता पुन्हा हातगाड्यांची संख्या वाढलेली आहे. बहादूरशेख नाक्यावर अनधिकृत फेरीवाले जोमात आहेत. विशेष म्हणजे येथे वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात असतात; परंतु त्यांच्याकडून या विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. फळ विक्रेते, हार विक्रेते, चहा आणि वडापाव विक्रेते यांच्यासह काहींनी टपऱ्या लावल्या आहेत.

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या प्रत्येक अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल. आम्ही प्रथम सूचना देतो, विक्रेत्यांनी स्वतःहून आपले केली अतिक्रमण काढले नाही तर कारवाई करतो. पालिकेकडे कर्मचारी कमी आहेत त्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक भागात कारवाई केली जात आहे – मंगेश पेढामकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 11/Apr/2025