खेड : आंबडस बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ३३ लाख

खेड : कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत खेड तालुक्यातील आंबडस येथील कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामाच्या ४ कोटी ३३ लाख ४० हजार ८८६ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती व नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाणीसाठा होऊन उपसा सिंचनाद्वारे खेड तालुक्यातील आंबडस, केळणे, काडवली व चिपळूण तालुक्यातील पाली या गावातील १२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

आंबडस गावातील वाशिष्ठी नदीच्या उपनाल्यावर १९७४ मध्ये दगडी बांधकामात बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्यात ०.८२१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. या बंधाऱ्याची लांबी १२२ मीटर असून, त्यावर एकूण ३५ स्तंभ व ३६ गाळे आहेत.

या कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याचे लाभक्षेत्र १२० हेक्टर इतके असून, खासगी उपसा सिंचनाद्वारे खेड तालुक्यातील आंबडस, केळणे, काडवली व चिपळूण तालुक्यातील पाली या गावातील क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याचे बांधकाम दगडी बांधकामात असून, बंधाऱ्याच्या बांधकामामधून व पायातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे पाणीसाठा होत नाही. पायातील दोन्ही बाजूंच्या दगडी बांधकामाचा व गाळ्याच्या खांबाच्या बांधकामाचे मॉर्टर निघून गेल्यामुळे व झाडेझुडुपे वाढल्यामुळे बांधकामाचे सांधे निखळले व खिळखिळे झालेले आहेत. बंधाऱ्यावरील आरसीसी स्लॅबचा पृष्ठभागही ओबडधोबड झाला आहे. उजव्या बाजूच्या २० खांबांपुढील स्लॅब तुटलेला आहे. या स्लॅबमधील लोहसळई तळाखालच्या बाजूने उघड्या पडलेल्या असून, त्यास गंज लागलेला आहे.

या बंधाऱ्यांमध्ये २००२-०३ पासून पाणीसाठा होत नाही. या अनुषंगाने बंधाऱ्याच्या सुरक्षितेच्यादृष्टीने दुरुस्ती होणे आवश्यक असल्याने कोकण पद्धतीच्या बंधारा या योजनेच्या दुरुस्ती कामाला विशेष दुरुस्तीअंतर्गत ४ कोटी ३३ लाख ४० हजार ८८६ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दिली आहे. तांत्रिक मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया होऊन खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होईल. याबाबत येथील लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विपुल खोत यांनीही बंधारा दुरुस्तीसाठी साडेचार कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे सांगितले.

दुरुस्तीचा फायदा शेतकऱ्यांना
तांत्रिक मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया या साऱ्या बाबींना काही महिने लागतील. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास आंबडसचे सरपंच नितीन मोरे यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 11/Apr/2025