रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे रत्नागिरी शहरातील प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साळवीस्टॉप येथे चार रस्त्यांवर वाहनचालकांची कसरत सुरू आहे. याठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहनांची प्रचंड गर्दी होत असल्याने अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. रस्त्याचे सपाटीकरण केल्याने कोणते वाहन कुठून आणि केव्हा येईल, हे समजत नसल्याने वाहनचालकांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. त्यात या रस्त्यांवर एकदिशा वाहतूक सुरू असल्याने वारंवार कोंडी होते. तिथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमणे आवश्यक आहे.
गेली दोन वर्षे मिया-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. साळवी स्टॉप ते नर्मदा सिमेट कंपनी या परिसरातून जाणाऱ्या वा महामार्गाचे काम सध्या कूर्मगतीने सुरू आहे. साळवीस्टॉप येथे हातखंब्याकडून रत्नागिरीकडे आणि रत्नागिरीहून हातखंब्याकडे तसेच परटवणेहून साळवीस्टॉपकडे व नाचणे रोडकडून या चौकात सतत वाहने ये-जा कातात. मुंबई-गोवा महामार्गासह कोल्हापूरकडे जाण्यासाठीही याच मार्गाचा उपयोग होतो. ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठीही हाच मार्ग आहे.
त्यामुळे या चौकातील वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे एकादिशा वाहतूक सुरू आहे. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या कालावधीत या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. या ठिकाणी रस्ता ओलांडून जाणे पादचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरते. या ठिकाणी वाहतूक पोलिस उपस्थित असतात. त्यामुळे आतापर्यंत अनुचित प्रकार घडलेला नाही; परंतु काहीवेळा पोलिस उपस्थित नसतील तर मात्र वाहनचालकांवर नियंत्रण राहत नाही. तेथे रत्नागिरीकडे येण्यासाठी बंरिगेट लावण्यात आले आहेत; मात्र परटवणेकडून हातखंब्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. या परिसरात माती टाकण्याचे काम सुरू असल्याने दिवसभर धुळीचेच साम्राज्य असते. काम सुरू असताना पाणी मारण्यात येते; मात्र दिवसा उन्हामुळे ते सुकून जाते. या परिसरातील झाडे, इमारतींवर’ धूळ साचलेली आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गावर नर्मदा सिमेंट ते साळवी स्टॉप आणि रत्नागिरी शहर ते साळवीस्टॉप असा जोडला गेला आहे. रस्त्यावरील काम धीम्या गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांची नियमित वर्दळ सुरू असते. येथून मार्गक्रमण करताना सावधगिरी बाळगावी लागते. या ठिकाणी आवश्यक ते फलक लावले पाहिजेत. तसेच कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमण्यात यावा. – प्रसाद सावंत, तालुकाप्रमुख, युवासेना (ठाकरे शिवसेना)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 11/Apr/2025














