संगमेश्वर : कोंढ्रणवासी पावसाळ्यात भीतीच्या छायेतच!

संगमेश्वर : कोंढ्रण गावी दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात भूस्खलन झाले होते. त्यानंतर तेथे उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत वास्तव्य करत असतात, त्याकडे पुढील पावसाळ्यापूर्वी तरी लक्ष दिले जाईल, अशी आशा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

देवरूखपासून जवळच असलेल्या कोंढ्रण गावात २७ जुलै २०२३ रोजी गावातील मागच्या उतारावरील रस्त्यावर भूस्खलन झाले होते. त्यामध्ये मातीचा ढिगारा कोसळला होता. हा प्रकार घडल्यानंतर महसूल विभागासह लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तातडीच्या उपाययोजना करून गावातील लोकांसह गुराढोरांचे जवळच स्थलांतर करण्यात आले. तेव्हा गाव पूर्णतः रिकामा झाला होता. या भूस्खलनाचा परिणाम कोंढ्रण गावाच्या पूर्वेकडील भागात झालेला नाही; परंतु गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काही भागाचे (५० मीटर) नुकसान झाले आहे.

तहसीलदारांनी ७ जून २०२४ रोजी भारतीय भगर्भ सर्वेक्षण विभागाला घटनेबद्दल माहिती दिली होती. भूस्खलनामुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे नुकसान झाले असून, भविष्यात धोका असल्यामुळे त्याचे मूल्यांकन करण्यासाठी गावाचे भूगर्भीय मूल्यांकन करा, अशी विनंती प्रशासनाने केली होती. त्यानंतर वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञांनी या परिसराची पाहणी केली. मुसळधार आणि सततच्या पावसामुळे गावाच्या मागील उतारावर ढिगारा कोसळल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

गावातील वस्तीपासून ५० मीटर अंतरावर बफरझोनसह मध्यम उतार हा सरकता आहे. गावाचा वरचा उतार कमी उंचीचा आहे. गावाचा खालचा उतार थोडासा केलेला आहे. गावातील सापेक्ष भूस्खलन ८०-१०० मीटर दरम्यान आहे. गावातील वस्तीच्या मागील उतारावर नैसर्गिक निचरा नाही. उतारामुळे आधार कापला जातो. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहासाठी योग्य निचरा होत नाही. पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते आणि सैल ओढ्यातून झिरपून जमिनीच्या समांतर भागात काही भेगाही निर्माण झाल्या आहेत.

२०१९ आणि २१ या वर्षात मागच्या उतारावर असलेल्या जाड ओव्हरवर्डन मटेरियलमध्ये गावातील वस्ती आणि रस्त्याच्या पातळीच्या अगदी वर त्या भेगांच्या खुणा दिसतात. गावाच्या मागे डांबरी रस्त्यावर सर्वांत मोठ्या भेगा आहेत. कोंढ्रण गावाजवळ भूस्खलनामुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाले आणि भविष्यातील धोका असल्यामुळे तो टाळण्यासाठी उपाययोजना सुचविलेल्या आहेत. यावर पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असतानाही त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

कोंढ्रण गावात झालेल्या भूस्खलनाला आता दोन वर्षे होत आली आहेत. जमीन खचत्यानंतर गाव रिकामा केला गेला. तज्ज्ञ मंडळी आणून जमिनीची तपासणी केली गेली. दोन वर्षांत प्रत्यक्षात गावाच्या सुरक्षिततेसाठी अथवा पुनर्वसनाच्यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना हाती घेतल्या गेलेल्या नाहीत. आता दीड महिन्यावर पावसाळा येऊन ठेपल्यामुळे यावर्षीही कोंढ्रण येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत- सत्यवान शिंदे, ग्रामस्थ कोंढ्रण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 11/Apr/2025