देवरुख : संगमेश्वर तालुक्यातून अनधिकृत लाकडांचे ट्रक व जनावरांची वाहतूक पकडून या चोरट्या वाहतुकीला आळा बसवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून देवरुख मार्लेश्वर मार्गावरील मारळ या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्ताचे ठिकाण भर वस्तीपासून दूर असून रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा वावर या ठिकाणाहून होत असल्याने हे ठिकाण भीतीदायक असून पूर्वीप्रमाणे बंदोबस्ताचे ठिकाण आंबा घाट या ठिकाणी सुरू करण्यात यावे, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
कोकणाकडून घाटमाथ्याकडे चोरट्या पद्धतीने जाण्यासाठी देवरुख मार्लेश्वर मार्गावरूनच कळकदरा मार्गे आंबा घाट व तेथून पश्चिम महाराष्ट्र असा मार्ग आहे. या मार्गाचा वापर करून कोकणातून चोरी करून चोरटे हा मार्ग अवलंबतात, याचप्रमाणे अनधिकृत वाळू व लाकूड तसेच जनावरांचा व्यवसाय करण्यासाठी या मार्गांचा वापर केला जातो. यामुळे हा मार्ग नेहमीच अनधिकृत व्यवसायासाठीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र हा मार्ग ज्या आंबा घाटात जाऊन मिळतो याच आंबा घाटाच्या समाप्तीनंतर पोलीस चेक नाका अनेक वर्षापासून यापूर्वी होता. यामुळे कोणत्याही मार्गावरून येणारा अनधिकृत वा चोरीचा माल आंबा घाट येथे पकडला जात असे.
मात्र कोल्हापूर व रत्नागिरी या दोन्ही विभागाच्या पोलीस यंत्रणेने हा चेक नाका बंद करून एक प्रकारे अनाधिकृत व्यापाराला चालना दिली. मुख्यमार्गातील चेक नाका बंद केल्यामुळे सर्रास या मार्गावरून अनधिकृत रित्या जनावरे व लाकूड यांची वाहतूक होत असते. आंबा घाट कोकणातून सुरू होत असताना मुर्शी या ठिकाणी देवरुख पोलीस ठाणे अंतर्गत चेक नाका ठेवण्यात आला आहे. मात्र हा चेक नाका ते आंबा घाट यामध्ये देवरुख कळकदरा मार्गे आंबा घाट हा मार्ग अनधिकृत व्यवसायांसाठी वापरला जातो. वेळोवेळी अनधिकृत जनावरांची वाहतूक, लाकूड वाहतूक मिळून आली आहे.
यामुळेच रत्नागिरी पोलिस विभागाकडून देवरुख कळकदरा मार्गावरील मारळ या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चोरटी वाहतूक करणाऱ्यांनी मारळ या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवल्यामुळे मारळ पूर्वी बोंड्ये मार्गे कळकदरा या मार्गाचा वापर केला जात आहे. ज्या उद्देशाने मारळ या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हा उद्देशच असफल झाल्याचे अन्य चोर मार्ग निर्माण झाल्यामुळे दिसून येत आहे.
असे असतानाही रत्नागिरी पोलीस विभागाकडून मारळ या ठिकाणी पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्ताचे ठिकाण निर्मनुष्य ठिकाणी असून या मार्गाच्या कडेला बाव नदी वाहत असल्याने वन्यप्राणी सर्रास या मार्गावरून वावरताना दिसून येतात. बंदोबस्ताला असलेल्या पोलिस यंत्रणेला या वन्य प्राण्यांपासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे येथील चेकपोस्ट बंद करण्यात यावा व पूर्वीप्रमाणे आंबा घाटाच्या शेवटी कोल्हापूर व रत्नागिरी पोलीस विभागाकडून संयुक्त चेक पोस्ट उभारण्यात यावे अशी मागणी होत आहे. जेणेकरून कोकणाकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी सर्व वाहतूक पोलिसांच्या निगराणी खाली राहू शकते.
यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जनतेच्या या मागणीचा गांभीयनि विचार करून व वस्तुस्थितीचा अभ्यास करून पूर्वीप्रमाणेच आंबा घाट या ठिकाणीच पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबत प्रयत्न करावा अशी मागणी परिसरातील जनतेकडून जोर धरून आहे.
देवरुख मार्लेश्वर मार्गावरील मारळ येथील चेकपोस्टवर पोलिस कर्मचारी व होमगार्ड या यंत्रणेला वन्य प्राण्यापासून जीव मुठीत धरून पोलीस सेवा बजवावी लागत आहे. त्यामुळे मारळ चेक पोस्ट बंद करून आंबा घाटातील चेकपोस्ट सुरू करावा व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचे संरक्षण करावे अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 11/Apr/2025














