मंडणगड, दि. १२ एप्रिल २०२५: मंडणगड नगर पंचायतीकडून भिंगलोली गावाच्या हद्दीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. भिंगलोली, पाट, आणि सुर्ले या गावांतील सुमारे १२ ते १५ जनावरे प्लास्टिक खाऊन दगावल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय, ६० ते ७० जनावरे प्लास्टिक खात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मंडणगड नगर पंचायतीला कचरा डेपो उभारण्यासाठी निधी मिळाला असतानाही, डम्पिंग ग्राउंड न उभारल्याने कचरा उघड्यावर टाकला जात आहे. यामुळे भिंगलोलीसह आजूबाजूच्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामस्थांनी मंडणगड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना लेखी आणि तोंडी निवेदने देऊनही केवळ आश्वासनांवर बोळवण केली जात असल्याचा आरोप आहे.
भिंगलोली गावाचे माजी उपसरपंच राकेश साळुंखे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, “नगर पंचायत करोडो रुपये खर्च करून स्वतःच्या हद्दीत डम्पिंग ग्राउंड उभारण्याच्या नादात आमच्या गावातील जनावरांचे जीव धोक्यात टाकत आहे. पुढील दोन दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास आम्ही रस्ता बंद करू आणि सर्व जनावरे नगर पंचायतीच्या हद्दीत बांधू.” या आंदोलनाला पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थांचा पाठिंबा आहे.
ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही मंडणगड नगर पंचायत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांच्या गुरांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे. भिंगलोली गावातील ग्रामस्थांनी आता कायदेशीर मार्ग आणि आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाने तातडीने कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मंडणगड नगर पंचायतीच्या या बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिकांचा संयम आता संपत चालला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 12-04-2025














