रत्नागिरी : नदीच्या डोहात बुडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथील सोमगंगा नदीच्या डोहात बुडून एका सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवांश श्रवण मोरे (वय ६, रा. जोगेश्वरी, मुंबई) असे मृत बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवांश हा त्याच्या नातेवाईकांसोबत मुंबईहून सत्यनारायणाच्या पूजेसाठी आणि पालखीसाठी दिनांक ९ एप्रिल रोजी गावी आला होता. काल, दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या चुलत मामा आणि वाडीतील इतर मुलांसोबत धामणसे जोशी वाडी येथील सोमगंगा नदीवरील डोह येथे आंघोळीसाठी गेला होता. पाण्यात बुडाल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, अधिक उपचारांसाठी त्याला रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासणी करून सायंकाळी ४.३० वाजता (१६.३० वा.) त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएसएस) १९४ नुसार आकस्मिक मृत्यू क्रमांक २६/२०२५ म्हणून करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 12-04-2025