जिल्हा परिषद शाळांचे भविष्य उज्ज्वल : मंत्री योगेश कदम

चिपळूण : गेल्या अडीच वर्षांपासून विद्यार्थी नसल्याने अनेक शाळा बंद पडत आहेत. ज्या ठिकाणी शाळा बंद पडल्या तेथील हायस्कूल विद्यार्थ्यांनी भरलेली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न आणण्याची गरज होती. आता सीबीएसई पॅटर्न सुरू होत असल्यामुळे पुढील काळात जिल्हा परिषद शाळांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित राज्य प्राथमिक शिक्षकसंघाच्या जिल्हा व तालुका शाखेच्या त्रैवार्षिक अधिवेशनात मंत्री कदम हे बोलत होते. ते म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर रत्नागिरी जिल्हा शिक्षकांच्यादृष्टीने सर्वात कठीण जिल्हा म्हणून ओळखला जातो. तरीही या जिल्ह्याची गुणवत्ता सर्वात जास्त आहे, याचा मला अभिमान आहे. शिक्षकांच्या विविध मागण्या, प्रश्न या विषयी येत्या पंधरा दिवसांत मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवले जातील. जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करूया.

२०२४ च्या संचमान्यतेचा शासननिर्णय हा जाचक असल्याचे शिक्षक संघटनाचे म्हणणे आहे. त्याच्या स्थगितीची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण, ग्रामविकास मंत्र्याबरोबर येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. सद्यःस्थितीत शाळांची अवस्था बिकट असली तरीही सीबीएसई पॅटर्नमुळे शाळांचा दर्जा वाढवण्याच्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. या वेळी अण्णा कदम, बाळकृष्ण जाधव, बाळासाहेब मारणे, बाळासाहेब झावरे, रावसाहेब रोहकले, आबासाहेब जगताप, कैलास दहातोंडे, बळवंत पाटील, बाळासाहेब तांबारे, विकास नलावडे, महेंद्र सावंत, संतोष कदम, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 12/Apr/2025