चिपळूण : अतिवृष्टीत वाशिष्ठी नदीचे पाणी चिपळूण शहरात शिरते. या पूरनियंत्रणासाठी शंकरवाडी-मुरादपूर भागातील नलावडा बंधाऱ्याच्या ठिकाणी भलीमोठी संरक्षक भिंत उभारली जात आहे. वाळूबंदीमुळे या कामात अजूनही अडचणी येत आहेत; मात्र मे अखेरपर्यंत बंधाऱ्याचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाणार आहे. आमदार शेखर निकम यांनीही या कामाची पाहणी करून पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या आहेत.
शहरामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडा बंधारा) जुन दगडी बांधकाम पूर्ण केलेले होते, परंतु २००५ च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे. २०२१ २०२ च्या महापुरातही मोठा फटका या भागासह शहराला बसला. यामुळे या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीसह स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने होत होती. त्या मागणीची दखल घेत आमदार निकम यांनी पावसाळ्यापूर्वी येथील संरक्षक भिंत उभारणीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
चिपळुणातील प्रीमियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट या कंपनीमार्फत हे काम सुरू आहे. तीन महिन्यापासून ही भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाशिष्ठी किनारी २८५ मीटर लांबी व १२ मीटर उंचीची ही भिंत आहे. पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प मार्गी लावावा, अशा सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत. त्यानुसार ठेकेदार कंपनीने कामाची गती वाढवली आहे. सद्यःस्थितीत २० कामगार, ३ पोकलेन, ४ डंपर, ब्रेकर, ५ टीएम अशी यंत्रसामुग्री कार्यरत आहे.
जलसंपदा विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या कामाला चांगलीच गती प्राप्त झाली आहे. १५ मे पर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल. त्यानंतर मे अखेरपर्यंत भराव व अन्य कामे पूर्ण केली जातील- दीपक जाधव, प्रकल्प व्यवस्थापक, प्रीमियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, चिपळूण
पाईप मोरीवर आक्षेप
जलसंपदा विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी ही भिंत उभी करण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, आता या बंधाऱ्याच्या मधोमध नियोजित असलेल्या पाईप मोरीवर स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेत विरोध दर्शवल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. पाईप मोरी ठेवल्यास पुन्हा शहरात पुराचे पाणी भरण्यास मदत होईल त्यापेक्षा सलग बंधारा उभारावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी पाहणी करून पाईप मोरीबाबत फेरविचार करावा, अशी सूचना दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 12/Apr/2025














