रत्नागिरी : तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ७१ जणांची “कायदा साथी” म्हणून न्यायालयाच्या वतीने निवड करण्यात आली आहे. “न्याय आपल्या दारी” ही उच्च न्यायालयाची संकल्पना असून, ती राबवण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम कायदा साथी करणार आहेत. महाराष्ट्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण योजनांचा लाभ लोकांना मिळावा, यासाठी कायदा साथीची निवड करण्यात आली आहे.
लोकांना आधार देण्याचे काम कायदा साथीकडून पोलिस मुख्यालय येथे होणार आहे. लवकरच याचा परिणाम दिसून येईल, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सावत यांनी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे न्यायालयात गुरुवारी (ता. १०) पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऑक्टोबर २०२४ पासून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे. येथे काम करताना जाणवले की, जिल्ह्यात “कायदा साथी “ची निवड आणि प्रशिक्षण घ्यावे जेणेकरून तळागाळातील लोकापर्यंत कायदा समजेल. यादृष्टीने जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे मागणी केली.
त्यांनी ती मान्य केली आणि डिसेंबरला अर्ज मागवले. अर्जाची छाननी केली. न्यायाधिशांनी या पदाच्या मुलाखती घेतल्या. दुरून येणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे मुलाखती घेतल्या. गुरुवारी न्यायालयात कायदा साथीचे प्रशिक्षण घेतले. वेगवेगळे विषय होते. इंदुमती मलुष्टे, ज्येष्ठ विधिज्ञ संकेत घाग यांनी फौजदारी गुन्ह्यांबाबत माहिती दिली. अॅड. सोनाली रहाटे यांनी बालन्यायालयाबाबत मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील ७१ कायदा साथी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तळागाळात न्यायालय अथवा वकीलवर्ग जाऊ शकत नाही. तेथील लोकांना न्याय मिळावा तसेच विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांचा लाभ, कायदा समजावा, यासाठी कायदा साथीची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७१ कायदा साथी तयार झाले असून, त्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले –माणिकराव सावंत, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 12/Apr/2025














