समुद्रकिनाऱ्यावर हवी स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षा, पार्किंग व्यवस्था

पावस : रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यावर परजिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातील पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र येथील किनाऱ्यांवर सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटक जास्त काळ किनाऱ्यावर थांबत नाहीत. त्यासाठी गोव्याच्या धर्तीवर स्वच्छता, पार्किंग व्यवस्था आणि पर्यटकांची सुरक्षा या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

त्यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्याची गरज आहे. पर्यटक जास्त काळ रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर आले वर स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या शेजारील सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तेथील समुद्र व खाडीकिनारी आवश्यक सोयीसुविधा पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गरम्य असे समुद्रकिनारे आहेत; परंतु तेथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. स्वच्छ भारत अभियानांतर्गत किनाऱ्याची स्वच्छता केली जाते; परंतु तीही वात्पुरतीच. त्यामुळे अस्वच्छ किनाऱ्यांवर पर्यटकांचा येण्याचा टक्का कमी होतो. त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे पर्यटकांची मोठीच अडचण होते.

अनेक वाहने रस्त्यावरच उभी करून ठेवावी लागतात. काहीवेळा किरकोळ अपघातही झालेले आहेत. शांत किनारे पाहिल्यानंतर अनेक पर्यटक समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरतात, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनुचित प्रकार घडतात. त्याचचरोवर अनेक पर्यटक बिनदिक्कत किनाऱ्यावर गाड्या आणून उभ्या करून ठेवतात.

भरती ओहोटीच्या वेळा माहिती नसल्याने त्या गाड्याही पाण्यात अडकतात. त्यानंतर गाड्या बाहेर काढण्यासाठी तारांबळ उडते. हे सर्व टाळण्यासाठी किनाऱ्यांवर कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमणेही तेवढेच गरजेचे आहे; परंतु त्या दृष्टीने प्रशासन गांभीयनि लक्ष देत नाही. त्याचबरोबर किनाऱ्यावर पर्यटकांना खिळवून ठेवणारे जलक्रीडांसारखे उपक्रम सुरू करणेही आवश्यक आहे.

अनेकवेळा पर्यटक एका दिवसात किनाऱ्यावर फिरून निघून जातात. त्यामुळे रत्नागिरीतील किनाऱ्यांकडे फक्त एक दिवसाचे पर्यटनस्थळ म्हणून पाहिले जाते. ही स्थिती बदलण्यासाठी गोव्यासह सिंधुदुर्गप्रमाणे सोयीसुविधा देणे आवश्यक आहे. गणपतीपुळे, आरे-वारे, गावखडीसह गुहागर, दापोली तालुक्यातील किनाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.

प्रशिक्षणाच्या निमित्ताने गोव्यात जाण्याची संधी मिळाली होती. तेव्हा विरंगुळा म्हणून कोलवा बीचवर जाण्याचा योग आला. तो किनारा विस्तीर्ण आहे तसेच तिथे स्वच्छता आणि सुरक्षारक्षकांची फौज तैनात केलेली होती. वाहन पार्किंग व्यवस्थाही होती. त्यामुळे कोणतीही अडचण नव्हती. किनारा नियमित स्वच्छ ठेवले जात असल्याने पर्यटकांची संख्या अधिक होती. किनाऱ्याकडे येणारे रस्तेही स्वच्छ होते. त्यामुळे किनाऱ्यावरच नव्हे तर परिसरातही फिरताना समाधान वाटत होते. त्याच धर्तीवरती जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर सुविधा दिल्या तर पर्यटकांचा राबता वाढू शकतो. जास्त वेळ पर्यटक किनाऱ्यावर राहतील. त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. – प्रसाद भिडे, संगमेश्वर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 12/Apr/2025