रत्नागिरीत भाजपाचे आता तीन तालुकाध्यक्ष होणार

रत्नागिरी : भाजपाने रत्नागिरी तालुक्यात संघटनात्मक जम बसवण्यासाठी ३ तालुकाध्यक्ष नेमण्याचे नियोजन केले आहे. सध्या भाजपाचे दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी तालुकाध्यक्ष पद असून त्यात आता मध्य रत्नागिरी तालुकाध्यक्ष पद वाढणार आहे. शहराध्यक्षासह तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची यादी वरिष्ठांकडे गेली आहे.

रत्नागिरी तालुक्यात भाजपाचे संघटन तसे मर्यादितच आहे. पुर्वीपासून शिवसेना-भाजप युती असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेच्या वर्चस्वामुळे भाजपाला सत्तेत वाटा मिळत होता. त्यामुळे कमी सदस्य निवडून आले तरी चालून जात होते. याचा परिणाम म्हणून भाजपच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन मजबुतीसाठी अपेक्षित प्रयत्न केले नाहीत.

सध्या राजकीय परिस्थिती बदलली असल्याने गावागावात भाजपचा संपर्क रहावा या दिशेने पदाधिकारी निवडीचे नियोजन करण्यात आले. दक्षिण तालुक्यात पाली, हरचेरी, पावस, गोळप, मध्य तालुक्यात करबुडे, मिरजोळे, नाचणे, खाडीपट्टा तर उत्तर रत्नागिरी तालुक्यात शिरगाव, वाटद, कोतवडे गटांचा समावेश आहे. पहिल्या नियोजनात एका संपुर्ण तालुक्याच्या अध्यक्ष पदाची विभागणी करुन दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी असे दोन तालुका अध्यक्ष पदे निर्माण करण्यात आली.

दक्षिण रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदासाठी दादा दळी, पिंट्या निवळकर, सचिन आचरेकर इच्छुक आहेत. उत्तर रत्नागिरी साठी विवेक सुर्वे, बापू गवाणकर तर नव्याने निर्माण होणाऱ्या मध्य रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदासाठी प्रतिक देसाई, मिथुन निकम, ओंकार फडके इच्छुक आहेत. या सर्व इच्छुकांची यादी प्रदेश नेत्यांकडे गेली असून मुबंईत लवकरच या संदर्भात निर्णय होऊन नवीन तालुकाध्यक्षांच्या निवडी २५ एप्रिलपूर्वी घोषित होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 18/Apr/2025