मेटा कंपनीने इन्स्टाग्रामवरील 18 वर्षांखालील मुलांच्या अकाउंटसाठी प्रायव्हसी आणि पॅरेंटल कंट्रोल म्हणजे पालक नियंत्रणाचे नवीन नियम लागू केले आहेत.
त्यामुळे यापुढे 18 वर्षाखालील सर्व अकाउंट हे Teen Accounts मध्ये रुपांतरित केले जातील. अशा यूजर्सना केवळ ते फॉलो करत असलेल्या किंवा आधीपासून कनेक्ट केलेल्या खात्यांद्वारे मेसेज आणि टॅग केले जाऊ शकते. याशिवाय सोशल मीडियावरील सेंसेटिव्ह कन्टेन्ट म्हणजे संवेदनशील सामग्री ही रिस्ट्रिक्टिव्ह सेटिंगमध्ये बदलली जाईल. सोशल मीडियाच्या वाढत्या नकारात्मक प्रभावामुळे मेटाने त्यांच्या धोरणात हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Instagram हे असे सोशल प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर जगभरातले कोट्यवधी यूजर्स करतात. फोटो आणि व्हिडीओ त्यावर शेअर केले जातात. जगभरातले सर्व सेलिब्रेटी असो वा राजकारणी, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ते जगाशी कनेक्ट असतात. या इन्स्टाग्रामचा वापर लहान मुलेही मोठ्या प्रमाणात करतात. पण सध्या सोशल मीडियावर नकारात्मकता वाढत असल्याचे अनेक अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मेटाने त्यांच्या धोरणात बदल केला आहे.
पालकांचे मुलांच्या अकाउंटचे नियंत्रण मिळणार
मेटाच्या नव्या नियमानुसार, 18 वर्षांखालील यूजर्सच्या अकाउंटचा नियंत्रण त्यांच्या पालकांकडे असणार आहे. असे यूजर्स केवळ पालकांच्या परवानगीने डीफॉल्ट सेटिंग्ज बदलू शकतात. पालकांना सेटिंग्जचा एक संच देखील मिळेल जेणेकरून ते त्यांची मुले कोणाशी संवाद साधत आहेत ते पाहू शकतील, तसेच ॲपचा वापर मर्यादित करू शकतील. सोशल मीडियाच्या वापरामुळे मुलांमध्ये आणि युवकांमध्ये डिप्रेशन, एंग्जाइटी आणि लर्निंग डिसेबिलिटी अशा समस्या निर्माण होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
Meta, TikTok आणि YouTube विरुद्ध खटला
Meta, ByteDance’s TikTok आणि Google चे YouTube मुळे मुले सोशल मीडिया अॅडिक्ट होत असल्याचा आधीच आरोप करण्यात येत आहे. यामुळे अमेरिकेत या कंपन्यांच्या विरोधात हजारो याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यांच्यावर खटलाही सुरू आहे. जनतेची दिशाभूल केल्याबद्दल या कंपन्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 18-09-2024