लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द पडवण ग्रामस्थांना गेल्या ३८ वर्षांपासून वेरवली बेर्डेवाडी धरणातील पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. धरणातून वेरवली खुर्द गावाकडे जाणाऱ्या पाईपलाईनचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेले असतानाही अद्यापही धरणातून पाणीपुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे वेरवली बुद्रुक गावाला धरणाचे पाणी सोडण्यात आले असताना वेरवली खुर्द गावाला पाणी वाटपाबाबत दुजाभाव का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी पाटबंधारे उपविभाग रत्नागिरी यांच्याकडे केला आहे.
वेरवली खुर्द-पडवण ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने पाटबंधारे उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांना पाणी प्रश्नाबाबत निवेदन दिले आहे. शेतकरी आणि पाणी टंचाई मात होण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या धरणाचे पाणी संबंधित गावांना मिळणार केव्हा? असा सवाल नागरिकांनी या निवेदनाद्वारे विचारला आहे.
वेरवली बेर्डेवाडी धरणातून वेरवली गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे वेरवली खुर्द-पडवण या गावांनी बेर्डेवाडी धरणाचे पाणी मिळावे यासाठी संघर्ष सुरू केला आहे. धरण प्रकल्पाच्या गेल्या ३८ वर्षापासून या गावांना पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे पाणी वाटपाबाबत आमच्या बाबत दुजाभाव का? असा संतप्त सवाल वेरवली खुर्द-पडवण गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
वेरवली खुर्द पडवण या गावातील ग्रामस्थांना बेर्डेवाडी धरण प्रकल्पाचे शेतीसाठी व अन्य कामासाठी पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे. बेर्डेवाडी धरणातून वेरवली खुर्द-पडवण या दोन गावांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी मोठा खर्च करून पाईप लाईन जोडणी करण्यात आली आहे. या कालव्याच्या पाईप लाईनचे काम पूर्ण झाले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून ग्रामस्थांना सांगण्यात येते. मात्र पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन दोन वर्ष झाली तरी देखील वेरवली खुर्द पडवणच्या ग्रामस्थांना अद्यापही पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असता ग्रामस्थांना पुरेशी आणि स्पष्ट माहिती मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एक प्रकारे पाटबंधारे विभागाकडून वेरवली खुर्द-पडवण ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असून त्यांच्या सहनशीलतेचा एक प्रकारे गैरफायदा घेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे पाणी वाटपात पाटबंधारे विभागाने दुजाभाव करू नये. वेरवली खुर्द-पडवण ग्रामस्थांची पाण्यावाचून होणारी गैरसोय लक्षात घेता येथील सर्व ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे. बेर्डेवाडी धरणातून पाणी मिळेल ही अपेक्षा असलेल्या वेरवली खुर्द पडवण ग्रामस्थांच्या पदरी आजपर्यंत उपेक्षाच पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करून त्यांची गैरसोय कायमची दूर करावी अशी मागणी वेरवली खुर्द-पडवण ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने पाठबंधारे उपविभाग रत्नागिरी यांच्याकडे करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 19/Apr/2025













