संगमेश्वर : तुरळ येथे महामार्गारील बाजूपट्ट्यांवर दगड आणि माती

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, महामार्गावर तुरळ येथे बाजूपट्टयांवर दगड आणि माती टाकण्यात आलेली आहे. त्याचा त्रास पादचारी आणि वाहनचालक यांना सहन करावा लागतो. त्यामुळे तुरळ ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीतर्फे लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हरेकर यांनी सांगितले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना ठेकेदाराकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काम सुरू असलेल्या ठिकाणी गतिरोधक किंवा दिशादर्शक फलक लावलेले नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. अनेकवेळा वाहने अनावधानाने काम सुरू असलेल्या रस्त्यावर जातात.

त्यांना काही अंतर गेल्यावर माघारी परतावे लागते. तसेच रस्त्याच्या मध्येच माती टाकल्यामुळे वाहने चालवताना अपघात होण्याचीही भीती आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक संतोष थेराडे यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. महामार्गावर बाजूपट्टयांवर दगड आणि माती टाकण्यात आल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झालेले आहे.

शाळा तसेच कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तिथे मोठी गर्दी होते. तसेच ग्रामस्थही मोठ्याप्रमाणात तिथे ये-जा करीत असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून बेट माती आणि दगड बाजूपट्टांवर टाकण्यात येत असल्यामुळे कृष्णा हरेकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये ग्रामस्थही मोठ्याप्रमाणात सहभागी होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 21/Apr/2025