चिपळूण : कर्नाटकी आंब्यामुळे हापूसचे दर उतरले

चिपळूण : स्थानिक बाजारपेठेत हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री सुरू झालेली आहे. कर्नाटकी आंबा कमी दरात विकला जात आहे. त्यामुळे हापूस आंब्याचे दरही उतरले आहेत. त्यामुळे बागायतरांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.

शहरातील बाजारपेठेत कर्नाटकच्य्या आंब्यांची आवक मोठी आहे. हे कर्नाटकचे आंबे घाऊक बाजारात आणि बाजाराबाहेरही रत्नागिरी-देवगड हापूस म्हणून विकले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अस्सल हापूस खरेदी करताना अनेक ग्राहकांची फसवणूक होत आहे. आपल्या अवीट गोडीने कोकणातील हापूस आंब्याने खवय्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यावर्षी हापूस आंबा कमी प्रमाणात झाडावर लागला आहे.

त्यामुळे जास्त दर ठेवून चांगले पैसे कमवण्याची बागायतदारांसमोर संधी होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात फळांचा हा राजा बाजारातही राजा ठरला होता. एप्रिलच्या सुरवातीला हापूस आंब्याचा दर पाच ते सहा हजार रुपये शेकडा असा होता. नंतर कर्नाटकी आंब्याची बाजारात इंट्री झाली हा आंबा अगदी कमी दरात उपलब्ध होऊ लागला त्यामुळे हापूसच्या मागणीला फटका बसला. बाजारात ५०० रुपये डझन या दराने हापूसची विक्री सुरू आहे. मोठा फळ असेल तर त्याला जास्त किंमत येते. कर्नाटकी आंब्यामुळे हापूसने मार खाल्याचे बाजारातून दिसत आहे.

बाजाराबाहेरही अनेक जण डोक्यावर आंब्याच्या पेट्या घेऊन घरोघरी जाऊन हापूस म्हणून त्या विकताना दिसतात; मात्र त्यातील बहुतांश विक्रेत्यांकडे कर्नाटकचे आंबे किंवा इतर जातींचे आंबे असतात. त्यामुळे अस्सल हापूस हवा असल्यास योग्य व्यापाऱ्यांकडूनच आंबा घ्यावा- प्रथमेश जाडे, आंबा विक्रेते, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 22/Apr/2025