Cyber Fraud Money Recovered : सायबर भामट्यांनी लुटलेले ५ लाख ३८ हजार रुपये परत मिळाले; बँक ऑफ इंडियाची तत्परता आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याला यश

Cyber Fraud Money Recovered : सायबर भामट्यांनी लुटलेले ५ लाख ३८ हजार रुपये परत मिळाले; बँक ऑफ इंडियाची तत्परता आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याला यश

खात्यातून परस्पर ५ लाख ८७ हजार रुपये झाले होते डेबिट; बँक आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे नागरिकाला मोठा दिलासा

Cyber Fraud Money Recovered : कष्टाने कमावलेला पैसा सायबर भामट्यांनी लुटल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात अखेर मोठे यश आले आहे. बँक ऑफ इंडियाच्या तत्परतेमुळे आणि उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. उदय सामंत यांच्या विशेष सहकार्यामुळे एका नागरिकाचे तब्बल ५ लाख ३८ हजार रुपये सुरक्षितपणे परत मिळाले आहेत. या यशामुळे सायबर गुन्ह्यांना सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा धीर मिळाला आहे.

नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, २५ जुलै रोजी धीरज नावाच्या नागरिकाच्या बँक खात्यातून अचानक २५ हजार, त्यानंतर २ लाख आणि पुन्हा २ लाख अशा व्यवहारांमुळे एकूण सुमारे ५ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम परस्पर डेबिट झाली. अचानक घडलेल्या या फसवणुकीमुळे त्यांना काय करावे सुचले नाही. त्यानंतर त्यांचे मित्र राजेश सोहोनी यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

राजेश सोहोनी यांनी वेळ न घालवता तातडीने बँक ऑफ इंडियाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून त्यांचे बँक खाते फ्रीझ करण्याची विनंती केली. बँकेच्या ऑनलाइन सेवा विभागाने तत्परता दाखवत तातडीने खाते फ्रीझ केले. यानंतर १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे अडचणी आल्या. अखेर सायबर क्राईमच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार नोंदवण्यात आली.

Shiva optical

बँक अधिकारी आणि पालकमंत्र्यांचे मोलाचे सहकार्य
राजेश सोहोनी यांचे बँक ऑफ इंडियाच्या जयगड शाखेत जुने खाते असल्याने, त्यावेळचे शाखा मॅनेजर धीरज कुमार यांच्याशी त्यांच्या जुन्या संबंधांनुसार संपर्क साधण्यात आला. त्यानुसार मुंबईत असलेले धीरज कुमार दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत दाखल झाले. बँकेत आल्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या प्रियांका कुमारी यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर ऑनलाइन अपलोड करणे आणि सायबर इन्शुरन्सचा अर्ज दाखल करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले.

तथापि, सायबर क्राईम विभागाकडून अपेक्षित पाठपुरावा किंवा प्रतिसादाअभावी अडचण निर्माण झाल्यानंतर, राजेश सोहोनी यांनी हा संपूर्ण प्रश्न उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. उदय सामंत यांच्यासमोर मांडला. पालकमंत्र्यांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासन, सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा पोलीस यंत्रणेच्या सायबर विभागाची संयुक्त बैठक बोलावली. या उच्चस्तरीय बैठकीमुळे तपासाला वेग आला.

अखेर सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक ऑफ इंडियाकडून धीरज यांच्या मोबाईलवर "तुमचा सायबर इन्शुरन्स मंजूर झाला असून ५,३८,००० रुपये जमा झाले आहेत", असा संदेश प्राप्त झाला. मित्राचे कष्टाचे पैसे परत मिळाल्यामुळे या संघर्षाला यश आले असून, बँक ऑफ इंडियाची सायबर इन्शुरन्स सुविधा आणि संकटकाळात मिळालेली मदत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या यशस्वी लढ्यात मदत करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वत्र आभार मानले जात आहेत.